ST Fare Hike: लालपरीचा प्रवास महागणार! महामंडळाने दिला तिकीट दर वाढीचा प्रस्ताव

ST Bus Price Hike : राज्यात एसटीच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये एसटीचा प्रवास सर्वाधिक केला जातो. सरकारने काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी निम्म्या दरात एसटी प्रवास उपलब्ध करण्याची देखील घोषणा केली होती. मात्र, आता लालपरीचा प्रवास महागणार आहे. भाडेवाढीबाबत महामंडळाने (MSRTC) प्रस्ताव ठेवला आहे.
सध्या एसटी महामंडळ तोट्यात आहे. महामंडळाला दररोज जवळपास 15 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी प्रवासाच्या तिकीट दरात जवळपास 14.95 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच प्रवाशांना लालपरीतून प्रवास करताना 20 ते 30 रुपये अतिरिक्त मोजावे लागू शकतात. या प्रस्तावावर राज्य सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी माहिती दिली की, मागील 3 वर्षापासून महामंडळाने कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. आता महामंडळाने 14.95 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला असून, त्यावर राज्य सरकार निर्णय घेईल.
नवीन वर्षात 3 हजार बसेसचा ताफ्यात समावेश करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. अशोक लेलँडच्या 2200 बसेस आणणार आहे. या बसेसचा ताफ्यात समावेश झाल्यानंतर जुन्या बसेस स्क्रप केल्या जातील. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ करण्यात आल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, महामंडळाला दररोज 15 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. महामंडळाचा संचित तोटा 11 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी सरकारकडून तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.





