MSRTC News : एसटीचा प्रवास अन् बनावट ओळखपत्र? सावधान! आता थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागणार
MSRTC News : एसटी महामंडळाचा बोगसगिरीला चाप; प्रत्येक दिव्यांग ओळखपत्राची होणार ऑनलाइन पडताळणी, दोषींवर गुन्हा दाखल होणार.

MSRTC News – एसटी प्रवासात बनावट दिव्यांग ओळखपत्रांच्या आधारे सवलतीचा गैरफायदा घेणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. बोगसगिरी रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाने कडक निर्णय घेतला असून, यापुढे प्रत्येक दिव्यांग प्रवाशाच्या यूडीआयडी (UDID) कार्डची ऑनलाइन पडताळणी केली जाणार आहे.
बनावट किंवा गैरवापर आढळल्यास संबंधित प्रवाशावर थेट पोलीस गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.एसटी महामंडळाकडून दिव्यांग प्रवाशांना तिकीट दरात ७५ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांत ही सवलत मिळवण्यासाठी बनावट किंवा दुसऱ्याच्या नावावरील यूडीआयडी कार्ड वापरण्याचे प्रकार वाढले आहेत.
यामुळे महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, खऱ्या गरजू दिव्यांगांचा हक्कही डावलला जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
तपासणीदरम्यान संशयास्पद ओळखपत्र आढळल्यास ते जागीच जप्त करण्यात येईल. जप्त कार्डांची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार असून, संबंधित व्यक्तीस भविष्यात कोणत्याही शासकीय सवलतीपासून वंचित ठेवण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
ही मोहीम केवळ बनावटगिरी थांबवण्यासाठी असून, वैध आणि अधिकृत यूडीआयडी कार्ड असलेल्या दिव्यांग प्रवाशांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.धावत्या बसमध्येही तपासणी प्रभावी करण्यासाठी एसटीतील सर्व वाहक, पर्यवेक्षक आणि तपासणी पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या मोबाइलमध्ये विशेष अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे.
या अॅपद्वारे यूडीआयडी कार्डचा क्रमांक किंवा क्यूआर कोड स्कॅन केल्यास प्रवाशाची संपूर्ण माहिती तात्काळ स्क्रीनवर दिसणार आहे. फोटो व माहिती जुळली नाही, तर कार्ड बनावट असल्याचे लगेच स्पष्ट होणार आहे.
“बनावट दिव्यांग ओळखपत्र वापरणे हा कायदेशीर गुन्हा आहे. प्रवाशांनी सवलतीचा लाभ घेताना केवळ अधिकृत यूडीआयडी कार्डच वापरावे आणि तपासणीदरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, जेणेकरून खऱ्या गरजूंना सवलतीचा लाभ सुरळीतपणे मिळू शकेल.”
– पल्लवी पाटील, आगारप्रमुख, वल्लभनगर






