पुणे | रिंगरोड हद्दीतील बांधकाम परवाना अधिकार एमएसआरडीसीकडे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 137 कि.मी लांबीचा पुणे रिंगरोड हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्प डिझाइन बिल्ड फायनान्स आॉपरेट-ट्रान्सफर या तत्वावर उभारला जाणार आहे.
ऐन विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याआगोदर राज्य शासनाने या रिंगरोड लगतच्या सुमारे पाच तालुक्यातील 117 गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार हे एमएसआरडीसीकडे राहणार आहेत.
रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या जागेचे संपादन एमएसआरडीसीकडून करण्यात येत आहे. या रिंगरोडलगत दोन विकास केंद्रे प्रस्तावित करण्यात आली असून ही दोन्ही विकास केंद्रे एमएसआरडीसीकडून विकसित करण्याचा इरादा शासनाने जाहीर केला आहे.
या 117 गावांमधील सुमारे 668 चौ.कि.मी. इतक्या क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसी काम पाहणार आहे.
रिंगरोड प्रकल्पाच्या विकासाशी संबंधित खर्चाची भरपाई विचारात घेता लॅंड मॉनिटायझेशन करण्यासाठी विविध लॅंड पुलिंग मॉडेल्सचा वापर करून या प्रदेशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यटन सुलभ करण्यासाठी संबधित जमिनींसाठी एमएसआरडीसीला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने नियुक्त केले आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.
एमएसआरडीसीला अधिकार दिलेली गावे…
हवेली : गोगलवाडी, माळखेड, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, खडकवाडी, माणेरवाडी, खानापूर,थोपटेवाडी, गोरे खुर्द, गोरे बुद्रुक, आगळंबे, जांभळी, भगतवाडी, घेरा सिंहगड, डोणजे, वंजाळेवाडी, खाडेवाडी, बहूली, सोनापूर, वरदाडे, संभारेवाडी, खामगाव मावळ, मोगरवाडी, कुडजे, मोकरवाडी
भोर : भांबवडे, भोंगवली, धनगवाडी, गुणंद, केंजळ, खडकी, मोरवाडी, न्हावी, निधन, निगडे, पांदे, पांजळवाडी, राजापूर, सांगवी खुर्द, सारोळे, सवर्डरे, तपरेवाडी,उंबरे, वाठार खुर्द, वाघजवाडी, देगाव, दिडघर, जांभळी, कंबारे, कंजाळे, करांदी, केटकवणे, खोपे, कोळवाडी, कुरुंगवाडी, कुसगाव, माळेगाव, पर्वडी, रांजे, सालवडे, सांगवी बुद्रुक, सोनवाडी, विरवाडी
पुरंदर : कोडित खुर्द, पुर, पोखर, वारवाडी ,कुंभोशी, सोमुर्डी, घेरापुरंदर, सुपे खुर्द, मिसळवाडी, थापेवाडी, भिवरी, भिवडी, बहीरवाडी, भोपगाव, पाथरवाडी, पिंपळे, पानवडी, हिवरे, कोडित बुद्रुक, अस्करवाडी, चांबळी, बोरहळेवाडी, गारडे
मुळशी : मुठा, बोतरवाडी, आंदगाव, खारावडे, साईव खुर्द, काटवडी ,डावजे , माळेगाव, वाजले, वातुंडे, जातेडे, चिंचवड, कोंढूर, चिखली बुद्रुक, बेलावडे, दरवळी, भरेकरवाडी, मोरेवाडी, विठ्ठलवाडी, टेमघर, खेचरे, मारणेवाडी, कोंढवले
वेल्हे : वरसगाव, कुरण बुद्रुक, मोसे बुद्रुक, साईव बुद्रुक, ओसाडे, निगडे मोसे





