MSEB Aundh – माहिती अधिकार कायदा कलम ४ (१) (ब) अंतर्गत स्वयंप्रेरणेने करावयाच्या प्रकटनाच्या अंमलबजावणीतील त्रुटींवरून जागृत नागरिक महासंघाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (एमएसईबी) औंध येथील कार्यालयाची धडक पाहणी केली. या पाहणीत अनेक गंभीर बाबी समोर आल्याने संबंधित अधिकाऱ्यांना महासंघाने कडक शब्दांत जाब विचारला. जागृत नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन शशिकांत यादव यांनी डिसेंबर २०२५ मध्ये माहिती अधिकार कायद्यानुसार पाहणीसाठी विनंती अर्ज केला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये स्मरणपत्र देण्यात आले. मात्र, एमएसईबी औंध कार्यालयाकडून या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप महासंघाने केला आहे. सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर चार महिन्यांनी कार्यालयाने उपस्थित राहण्याचे पत्र दिले. त्यानुसार बुधवारी (दि. ८) दुपारी १२:३० वाजता अध्यक्ष नितीन यादव, उपाध्यक्ष राजेश विश्वकर्मा, सचिव राजू डोगीवाल, सदस्य प्रकाश गडवे व कमलाकर कुलकर्णी यांनी कार्यालयात उपस्थित राहून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी माहिती अधिकार कायदा कलम ४ (१) (ब) अंतर्गत १७ मुद्द्यांच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यात आली. पाहणीदरम्यान अध्यक्ष नितीन यादव व उपाध्यक्ष राजेश विश्वकर्मा यांनी कार्यालय प्रमुख सहाय्यक कार्यकारी अभियंता उमेश करपे यांच्याकडे माहिती अधिकाराबाबतची अनास्था व बेपर्वाई यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. माहिती अधिकार कायद्याला हलक्यात घेऊ नका, अनेकांना यामुळे नोकरी गमवावी लागली आहे, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. पाहणीत आढळलेल्या सर्व त्रुटी महासंघाच्या सूचनांनुसार लवकरच दुरुस्त करण्यात येतील, असे आश्वासन सहाय्यक कार्यकारी अभियंता उमेश करपे यांनी दिले. तसेच महासंघातर्फे लवकरच सविस्तर त्रुटी अहवाल सादर करून त्याच्या पूर्ततेसाठी शंभर टक्के पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.