एम.एस.धोनीचा बायोपिक पुन्हा होणार रिलीज; जाणून घ्या, नेमकं कारण काय?

नवी दिल्ली – महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारीत ‘MS Dhoni – The Untold Story’ हा सिनेमा सप्टेंबर 2016 ला प्रदर्शित झाला होता. पण यावर्षी 12 मे या दिवशी हा सिनेमा पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा सात वर्षांनंतर पुन्हा आता का रिलीज करण्यात येणार आहे, याचे मागचे मोठे कारणही समोर आले आहे. धोनीच्या निवृत्तीची सध्या जोरदार चर्चा सुरु असताना धोनीने आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा संभ्रमात पाडले आहे.
सध्या धोनी कोणत्याही मैदानात गेला की त्याच्या नावाचे नारे चाहते द्यायला सुरवात करतात. प्रत्येक मैदानात हीच गोष्ट घडते आहे. त्यामुळे या गोष्टीचा फायदा उचलण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. धोनीच्या सिनेमात जसे दाखवले गेले आहे, तसेच आत्ताही घडत आहे. त्यामुळे धोनीचा सिनेमा जर आता पुन्हा रिलीज केला तर तो चांगला हिट ठरू शकतो, असे वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सिनेमा 12 मे या दिवशी पुन्हा एकदा रिलीज करण्यात येणार आहे.
काय होते धोनीचे वक्तव्य…
दरम्यान, बुधवारी चेन्नई आणि लखनौचा सामना सुरु होण्यापूर्वी. धोनी टॉसला आला होता त्यावेळी न्यूझीलंडचा माजी खेळाडू डॅनी मॉरिसन हा समाचोलन करत होता. टॉसच्या नंतर मॉरिसनने धोनीला विचारले की, “हा तुझा शेवटचा हंगाम आहे. तु या शेवटच्या हंगामाचा चांगला आनंद लुटत आहेस ना ?” धोनी यावर सुरुवातीला फक्त हसला. त्यानंतर धोनी म्हणाला की, “माझा हा शेवटचा हंगाम आहे हे तुम्हीच ठरवणार? ” त्यानंतर एकच हशा पिकला. त्यामुळे धोनी आता 12 मे या दिवशी निवृत्ती घेणार का, ही चर्चा सध्याच्या घडीला सुरु झाली आहे.





