Mrunal Thakur: मृणाल ठाकुर, अदिवी शेष यांच्या ‘डकैत’चा टीझर कधी येणार? तारीख जाहीर

Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकुर आणि अभिनेता अदिवी शेष यांची आगामी फिल्म ‘डकैत’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेट जाहीर झाल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मृणाल ठाकुरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली की ‘डकैत’चा दमदार टीझर १८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे, टीझर दोन शहरांमध्ये वेगवेगळ्या वेळेला दाखवला जाणार आहे. मुंबईतील गॅलेक्सी थिएटरमध्ये सकाळी ११ वाजता, तर हैदराबादमध्ये संध्याकाळी ६.३० वाजता टीझरची झलक पाहायला मिळेल. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये जगभरातील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
‘डकैत’ची कथा काय आहे?
‘डकैत’चे दिग्दर्शन शेनिल देव यांनी केले आहे. या चित्रपटात मृणाल ठाकुर, अदिवी शेष यांच्यासोबत प्रकाश राज, सुनील, अतुल कुलकर्णी, जैन मेरी खान, कामाक्षी भास्कर आणि अनुराग कश्यप महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा एका रागीट गुन्हेगाराभोवती फिरते, जो प्रेयसीकडून झालेल्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी धोकादायक मार्ग स्वीकारतो.
या चित्रपटाची निर्मिती सुप्रिया यारलागड्डा यांनी केली असून सुनील नारंग सह-निर्माते आहेत. अन्नपूर्णा स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटात हाय-एंड अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. शूटिंगदरम्यान काही कलाकारांना दुखापतही झाली होती.
दरम्यान, मृणाल ठाकुर नुकतीच ‘सन ऑफ सरदार-2’ या चित्रपटात झळकली होती. आता ‘डकैत’मधील तिच्या भूमिकेकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले असून, टीझरनंतर या चित्रपटाची चर्चा आणखी वाढण्याची शक्यता आहे.





