Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकुर सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘दो दीवाने सहर में’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भीगी भीगी’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. या दरम्यान काही काळापासून तिचं नाव अभिनेता धनुष याच्यासोबत जोडलं जात आहे. लग्नाच्या अफवाही पसरल्या होत्या, मात्र त्या नंतर खोट्या ठरल्या. या सगळ्या चर्चांमध्येच मृणालने प्रेमाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका मुलाखतीत मृणाल म्हणाली की, प्रेम हा खूप सुंदर आणि सकारात्मक अनुभव आहे. “या जगात प्रत्येक व्यक्तीने प्रेमाचा अनुभव घ्यायला हवा. प्रेम तुम्हाला अधिक चांगला माणूस बनवतं,” असं ती म्हणाली. प्रेमामुळे माणूस आपल्या आतल्या लहान मुलाच्या भावना समजून घेतो आणि त्या जखमा भरून निघण्यास मदत होते, असंही तिने सांगितलं. प्रेमात मुली जास्त समजूतदार होतात का? या प्रश्नावर मृणालने असहमती दर्शवली. ती म्हणाली, “तसं असायलाच हवं असं नाही. जो कोणी प्रेमात असतो तो अधिक देणारा होतो मग तो स्त्री असो किंवा पुरुष. प्रेमात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्वीकारणं. कधी कधी प्रेम स्वीकारणं आणि समजून घेणं कठीण असतं. आज प्रेमाची व्याख्या सतत बदलत आहे.” Mrunal Thakur प्रेम म्हणजे स्वतःला समर्पित करणं मृणाल पुढे म्हणाली की, प्रेम ही एकमेव स्थिर भावना आहे. “तुम्ही प्रेमाला कसं पाहता, यावर सगळं अवलंबून असतं. जेव्हा तुम्ही प्रेमात असता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असता. त्या नात्यात तुम्ही स्वतःला पूर्णपणे समर्पित करता,” असं तिने सांगितलं. कामाच्या आघाडीवर मृणाल ठाकुर लवकरच रोमँटिक ड्रामा ‘दो दीवाने सहर में’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहे. दोन व्यक्तींमधील आदर्श प्रेमकथा सांगणारा हा चित्रपट 20 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसंच, ए.आर. रहमान यांच्या संगीतातील ‘भीगी भीगी’ हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.