Mrunal Thakur : मृणाल ठाकूरला बायोपिकची भीती! अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली ‘मला अशा….’
Mrunal Thakur : मृणालने ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटानंतर लगेचच ‘पूजा मेरी जान’ साइन केला होता. गंभीर विषयांवर आधारित चित्रपट करण्यासोबतच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याचीही तिची इच्छा आहे.

Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. नुकताच तिचा ‘पूजा मेरी जान’ हा गंभीर विषयावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एका मुलाखतीत मृणालने चित्रपटांच्या निवडीबाबत आपले मत व्यक्त केले असून, बायोपिक चित्रपटांबद्दल वाटणाऱ्या भीतीचाही खुलासा केला आहे.
मृणालने ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटानंतर लगेचच ‘पूजा मेरी जान’ साइन केला होता. गंभीर विषयांवर आधारित चित्रपट करण्यासोबतच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याचीही तिची इच्छा आहे. मात्र, बायोपिकमध्ये काम करण्याबाबत ती थोडी साशंक असल्याचे तिने मुलाखतीत सांगितले.
बायोपिकमध्ये काम करण्याबाबत मृणाल काय म्हणाली?
मृणालने सांगितले की, तिला बायोपिक चित्रपटांची थोडी भीती वाटते. तिने अलीकडे पाहिलेला ‘मायकल’ हा गायक मायकल जॅक्सनच्या आयुष्यावर आधारित चित्रपट होता. बायोपिक यशस्वी होण्यासाठी योग्य कलाकाराची निवड अत्यंत महत्त्वाची असते, असे तिचे मत आहे.
एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची भूमिका साकारताना त्या व्यक्तीशी साम्य असणे आणि तिचे व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे पडद्यावर उभे करणे गरजेचे असते. प्रेक्षकांना एखाद्या कलाकाराला त्या व्यक्तीच्या भूमिकेत स्वीकारण्यासाठी वेळ लागत असेल, तर अशा चित्रपटाचा भाग होण्याबाबत आपण विचार करणार नाही, असेही मृणालने स्पष्ट केले.
तब्बू, विद्या बालन आणि करीना कपूर यांच्या चित्रपट निवडीचेही मृणालने कौतुक केले. मनोरंजनासोबत सामाजिक विषयांनाही महत्त्व देत या अभिनेत्री ज्या पद्धतीने भूमिका निवडतात, त्याच मार्गाने आपल्यालाही पुढे जायचे आहे, असे तिने म्हटले.
मृणालच्या आगामी चित्रपटांची उत्सुकता
मृणाल ठाकूरने ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे मृणाल पुढे कोणत्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
France: फ्रान्समध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका! ५ लाख लोक रस्त्यावर, १,२०० जणांना अटक






