‘40 लाख द्या अन् ‘MPSC’चा पेपर घेऊन जा’, धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; आयोगाने केले ‘हे’ आवाहन

MPSC Paper: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) 2 फेब्रुवारीला ‘गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहेत. राज्यभरातील जवळपास 869 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, परिक्षेला वघे काही दिवस बाकी असतानाच 40 लाख रुपयात पेपर उपलब्ध करून देण्यासंदर्भातील एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.
40 लाख रुपयात ‘गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024’ परीक्षेचा पेपर उपलब्ध करून दिला जाईल, असे फोन अनेक परिक्षार्थ्यांना आले आहेत. यासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी आता आयोगाकडून तक्रार दाखल करण्यात आली असून परिक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
40 लाखात पेपर…
2 फेब्रुवारीला होणाऱ्या ‘गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024’ परीक्षेची प्रश्नपत्रिका आदल्या दिवशी उपलब्ध करून दिली जाईल, अशा स्वरुपाचे कॉल अनेक विद्यार्थ्यांना आले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून 30 ते 40 लाख रुपयांची मागणी देखील केली जात आहे. केवळ पूर्व परीक्षाच नाही, तर मुख्य परिक्षेची प्रश्नपत्रिका देखील आधीच उपलब्ध केली जाईल, असा दावाही फोनवरून केला जात आहे. अशाप्रकारची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सर्व प्रश्नपत्रिका सुरक्षित-आयोग
हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर आता यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. परिक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित असून, उमेदवारांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आयोगाने म्हटले आहे. याप्रकरणी आयोगाने पोलीस आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रारही दाखल केली आहे.
एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामुळं परीक्षार्थींनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं, असे आयोगाने म्हटले आहे.





