MPSC वरही कोरोनाची वक्रदृष्टी; परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित

मुंबई – राज्यातील कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता राज्य सरकारने आज महाराष्ट्रातील लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. याबाबत प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तसे पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले असून या पत्रामध्ये लोकसेवा आयोगाला स्पष्ट सांगण्यात आले आहे की, “करोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून कोणत्याही कारणास्तव होणाऱ्या गर्दीस प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२० पर्यंत आपल्या स्तरावरून घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. अशा सूचना आपणास सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने देण्यात येत आहेत. तरी त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.”
दरम्यान, कोरोना या साथीच्या आजाराचा अटकाव करता यावा यासाठी राज्यात Epidemic Act,1897 या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर राज्यातील MPSC च्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात आल्या आहेत.
अशातच राज्य सरकारचे या निर्णयाला राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत दुजोरा दिला असल्याने आता राज्यात MPSC च्या परीक्षा येत्या ३१ मार्च पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून या परीक्षांचे भवितव्य आता राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे.





