MPSC Exam: एमपीएससीचा मोठा निर्णय! तूर्तास ऑनलाईन परीक्षा नाहीच; ‘या’ तारखेपर्यंत निर्णय लांबणीवर
MPSC Exam: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय.

MPSC Exam – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तडकाफडकी ऑनलाइन परीक्षा पद्धती विरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी समस्त स्पर्धा परीक्षार्थींनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनाला काही प्रमाणात यश आले आहे. एमपीएससीकडून ऑनलाइन परीक्षा पद्धत ऑगस्ट २०२७ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली असून, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा- २०२६ च्या ऑफलाइन परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाइन परीक्षेवरून विविध विद्यार्थी संघटनांची पुणे आणि राज्यभरात मोर्चे व आंदोलने सुरू होती. यापूर्वी विविध ऑनलाइन परीक्षांमध्ये झालेले गैरप्रकार पाहता या पद्धतीला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध होता. आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली होती.
विद्यार्थ्यांच्या या मागण्यांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक विशेष बैठक घेतली. विद्यार्थ्यांच्या भावना आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय दिला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा – २०२६ अंतर्गत २ हजार ६१९ पदे आता पूर्णपणे जुन्या,
सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीनेच ओएमआर शीट पद्धतीनेच घेतली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अतिरिक्त वेळ मिळाला असून, सुधारित तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा- २०२६ परीक्षा २७ सप्टेंबरऐवजी २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी होणार आहे. गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २७ डिसेंबरला आहे.
“जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्वतः कोणत्याही खासगी कंत्राटदाराशिवाय एकाच टप्प्यात संपूर्ण पारदर्शकतेने ऑनलाइन परीक्षा घेण्याची पूर्ण क्षमता निर्माण करत नाही, तोपर्यंत ऑनलाइन परीक्षेचा निर्णय पुन्हा घेतला जाऊ नये.”
– नितीन आंधळे, स्पर्धा परीक्षार्थी



