नवी दिल्ली – राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तर गाठीभेटींनाही वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी यांनी भाजपच्या दोन मंत्र्यांची भेट घेतली आहे. निलेश लंके यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाली आहे. निलेश लंके यांचे लोकसभेतील पहिलेच भाषण गाजले. त्यांच्या भाषणात लोकसभाध्यक्षांनी हस्तक्षेप केला तेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना बोलू द्या म्हणत अध्यक्षांना विनंती केली होती. त्यांच्या भाषणाची चर्चा विरते ना विरते तोच निलेश लंके यांनी आता दिल्लीत भाजपच्या दोन मंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.