नेवासा येथील रासने कुटुंबाचं खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून सांत्वन

नेवासा – शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (ठाकरे गट) खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नेवासा येथील रासने कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सोमवारी नेवासा फाट्यावरील कालिका फर्निचरच्या गोदामाला लागलेल्या आगीत रासने कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने नेवासा शहर आणि तालुक्यात शोककळा पसरली आहे. खासदार वाकचौरे यांनी अरुण रासने यांची भेट घेऊन कुटुंबियांना धीर दिला.
यावेळी वाकचौरे म्हणाले, “मी नेवासा येथे गटविकास अधिकारी असल्यापासून रासने कुटुंबाशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रासने कुटुंबाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्यासोबत आहे. शासकीय मदत मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.”
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, माजी उपसरपंच गोरखभाऊ घुले, डॉ. करणसिंह घुले, शहराध्यक्ष नितीन जगताप, स्वप्नील मापारी, युवा सेनेचे निरज नांगरे, मंडलाधिकारी अनिल गव्हाणे, बाळासाहेब सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.





