satara | विधानसभा मतदारसंघातील हालचाली महत्त्वाच्या

सातारा, {श्रीकांत कात्रे} – माढा व सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणातील मुख्य लढत असलेल्या प्रमुख उमेदवारांसह अन्य उमेदवारांनीही आपल्या प्रचाराला गती दिली आहे. विविध व्यक्ती व संस्था संघटनांच्या पदाधिकारयांबरोबर गाठीभेटी घेण्यावर सध्या भर आहे. काही ठिकाणी पदयात्रा किंवा छोट्यामोठ्या सभाही होऊ लागल्या आहेत.
उमेदवार स्वतः पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. तर काही नेत्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रचाराला हातभार लावला आहे. मात्र, विधानसभा मतदारसंघनिहाय होणारा प्रचार अनेकदा निर्णायक असतो, हे यापूर्वी स्पष्ट झाले असल्यामुळे विधानसभा मतदारसंघात होणाऱया हालचालींना उमेदवारांकडून मोठे महत्व दिले जात आहे.
सातारा लोकसभा मतदारंसघात विधानसभेचे सातारा, कोरेगाव, वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण असे सहा मतदारसंघ आहेत. तर माढा मतदारसंघात फलटण व माण हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. सातारा मतदारसंघात यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीच्यावेळी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या होत्या. त्यामुळे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या एकाच पक्षाच्या उमेदवारांना समन्वयाने एकमेकांचे काम करणे भाग होते.
कारण मते मिळविण्यासाठी दोघांचेही गणित एकमेकांवर अवलंबून होते. यावेळी तसे नाही. विधानसभेची निवडणूक नाही. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराची सारी भिस्त विधानसभेतील आपल्या पक्षाच्या नेत्यांवर अवलंबून राहिली आहे. त्यातही आता केवळ एकच पक्ष नाही. महायुती किंवा महाविकास आघाडी असल्याने आपल्या पक्षाबरोबरच मित्रपक्षांतील नेत्या- कार्यकर्त्यांशी जूळवून घेत उमेदवाराला लोकांपर्यंत पोहचण्याची कसरत करावी लागणार आहे.
सातारा मतदारसंघात सातारा, वाई, कोरेगाव, पाटण या चार विधानसभा मतदारसंघातील आमदार महायुतीचे आहेत. तर कराड उत्तर व कराड दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी आहेत. ही कागदावरील आकडेवारी कुणाच्या फायद्याची हे आणि कुणाच्या तोट्याची आहे, अशी चर्चा होऊ शकते.
पण.. या पणमध्येच खूप काही दडलेले असते. देशात, राज्यात युती आहे, किंवा आघाडी आहे असे म्हणून चालत नाही. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकारणाचे चित्र वेगवेगळे असते. कारण त्या राजकारणाला स्थानिक कंगोरे वेगवेगळे असतात. राज्यात मित्रपक्ष असले तरी इथे वर्षानुवर्षे एकमेकांचे विरोधक असल्याने इथे युतीचा किंवा आघाडीचा धर्म पाळलाच जाईल याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही.
याचे उदाहरण माढा मतदारसंघात प्रकर्षाने जाणवले आहे. इथे युतीच्या उमेदवारापुढे मित्रपक्षाचेच आव्हान आहे. सातारा मतदारसंघात तसा उघड विरोध कुणाचाच नाही. मात्र, युती आणि आघाडीमध्येही काही प्रमाणात नाराजी, थोडीशी धुसफुस, किरकोळ प्रमाणातील मतभेद असा प्रकार आहेच.
त्यामुळे प्रत्येक पक्षाला आणि उमेदवाराला डोळ्यात तेल घालून विधानसभा मतदारसंघातील हालचालींकडे लक्ष ठेवणे भाग पडत आहे. सध्याच्या प्रचाराच्या रणधुमाळीत लोकांशी संपर्क साधतानाच अशा नाराज आणि वेगळे काही करु इच्छिणाऱया नेत्या कार्यकर्त्यांची मनधरणी उमेदवाराला करावी लागते.
तुमच्या विधानसभेच्यावेळी बघू…
स्थानिक पातळीवर एकमेकांचा विरोध करणारे छोटे मोठे नेते- कार्यकर्ते आपापल्या चाली चालत असतातच. तुमच्या विधानसभेच्यावेळी बघू, आता काही सांगू नका असे आमदारालाच ठणकावणारे कार्यकर्तेही काही ठिकाणी असतात. त्यामुळे अशी गोळाबेरीज करण्याची कसरत लोकसभेच्या उमेदवाराला करावी लागते.
पुन्हा तोंडावर हो… हो म्हणत उमेदवाराची पाठ फिरल्यावर तो नेता किंवा कार्यकर्ता काय करेल हे वेगळेच. अशा अनेक घटकांना सांभाळत उमेदवार आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत राहतो. एवढे करूनही शेवटी मतदारराजा काय करणार याची गॅरंटी तर कुणीच देऊ शकत नाही. ती निकालातूनच कळते.





