पुणे | जिल्हा परिषदेसमोर दिव्यांगांचे आंदोलन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय दिव्यांग प्रमाणपत्र काढून लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरतपासणी करावी, यासह दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर अपंग प्रहार क्रांती संघटनेने आंदोलन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पुणे जिल्ह्यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतींनी ५ टक्के दिव्यांग निधी चार ते पाच वर्षांपासून खर्च केला नाही. सरकारी गायरान जागेत राहत असलेल्या दिव्यांग व्यक्तींना एक गुंठा जागा राहण्यासाठी शासनाने द्यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना शिफारस
प्रस्ताव पाठवावा,
एक हजार रुपये जिल्हा परिषद निर्वाह भत्ता द्यावा, जिल्हा समाजकल्याण कार्यालयामध्ये दिव्यांगांच्या विशेष शाळेतील प्रतिनियुक्त कर्मचारी कार्यमुक्त करुन संबंधित शाळांमध्ये वर्ग करावेत, घरकुल मंजुुरीसाठी मागणी केलेल्या सर्व दिव्यांग अर्जदारांचे घरकुल तात्काळ मंजूर करावे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धमेंद्र सातव, प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या सुरेखा ढवळे, पुणे जिल्हाध्यक्ष शरद जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अनिता कदम, कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे यांच्यासह अन्यजण उपस्थित होते़
जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर तब्बल तीन तास आंदोलन सुरु होते. त्यानंतर सीईओ संतोष पाटील यांनी आंदोलन कार्यकर्त्यांची बैठक घेतली व सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे आदी उपस्थित होते.





