One Nation, One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकासाठी हालचाली सुरू ! सोमवारी सादर करणार दोन विधेयके

One Nation, One Election – एक देश, एक निवडणूक ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. येत्या सोमवारी त्या प्रस्तावाशी संबंधित दोन विधेयके लोकसभेत सादर केली जाणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच एक देश, एक निवडणूक प्रस्तावाला मंजुरी दिली. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा त्यामागील उद्देश आहे.
मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल त्या प्रस्तावाशी संबंधित विधेयके लोकसभेत सादर करतील. घटना (१२९ वी दुरूस्ती) विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरूस्ती) विधेयक म्हणून ती विधेयके ओळखली जातील. विविध कारणांमुळे एकत्रित निवडणुका घेणे अत्यावश्यक बनले आहे.
निवडणुकांची प्रक्रिया राबवणे ही अतिशय खर्चिक बाब बनली आहे. त्या प्रक्रियेसाठी मोठा वेळही लागतो. निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होते. त्यामुळे विकास कार्यक्रम ठप्प होतात. त्याशिवाय, सामान्य सार्वजनिक जीवनात व्यत्यय निर्माण होतो, अशी कारणे घटनादुरूस्ती विधेयकात नमूद करण्यात आली आहेत.





