मुंबई: सरकारी सेवेत अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली ही नेहमीची प्रक्रिया असते. यामागे स्थानिक नेते किंवा प्रशासकीय यंत्रणेतील हितसंबंध टाळून पारदर्शकता राखण्याचा हेतू असतो. मात्र, काही अधिकारी राजकीय नेत्यांची मर्जी आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळवून वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी बसून राहतात. अशा अधिकाऱ्यांचे हितसंबंध वाढतात आणि सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो. ही बाब राज्य परिवहन (एसटी) महामंडळालाही लागू आहे. याच पार्श्वभूमीवर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळात तीन वर्षांहून अधिक काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. आमदार गोपिचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील कामगार संघटनेने याबाबत आग्रही मागणी केली होती. कामगार संघटनांच्या मागणीला मिळाला प्रतिसाद – एसटी कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले आणि अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले. बैठकीला आमदार गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पडळकर म्हणाले, “काही अधिकारी वर्षानुवर्ष एकाच मुख्यालयात बसून ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध जोडतात. यामुळे इतर सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो आणि प्रशासनाची कार्यक्षमता ढासळते. त्यामुळे तीन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली व्हायला हवी.” या मागणीला पाठिंबा देत सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याचा आढावा घेऊन त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांवरही चर्चा – या बैठकीत फक्त बदलीचाच मुद्दा नव्हे, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांवरही सविस्तर चर्चा झाली. अधिवेशनानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सरनाईक यांनी दिले. कर्मचाऱ्यांचे वेतन, सुविधा आणि इतर आर्थिक प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे संकेत त्यांनी दिले. कामगार संघटनांनीही या आश्वासनाचे स्वागत केले आहे. संगमनेर बसस्थानकाच्या समस्यांवरही लक्ष – दरम्यान, संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) बसस्थानक परिसरातील समस्यांबाबत आमदार सत्यजित तांबे आणि अमोल खताळ यांच्या शिष्टमंडळाने मंत्री सरनाईक यांच्याशी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागेचा विस्तार, नाशिक-पुणे महामार्गावरील बसेसना संगमनेर बसस्थानकात थांबा देणे यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर विचारविनिमय झाला. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. संगमनेरमधील प्रवाशांच्या सोयीसाठी हे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत. पारदर्शकतेसाठी कडक पाऊल – एसटी महामंडळात वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले अधिकारी हा चर्चेचा विषय राहिला आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे प्रशासनात गैरप्रकारांना खतपाणी मिळतं, असा आरोप कामगार संघटनांकडून सातत्याने होत आला आहे. आता परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयामुळे प्रशासनात पारदर्शकता येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा निर्णय प्रत्यक्षात कसा उतरतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.