पुणे जिल्हा | एव्हरेस्टवीर ननवरे यांच्याकडून माउंट मनासलू शिखर सर

लोणी काळभोर (वार्ताहर) – महाराष्ट्र पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी जगातील आठव्या क्रमांकाचे उंच असलेले माउंट मनासलू शिखर सर केले आहे.
संपूर्ण भारतातील पोलीस दलातील कुठल्याच आधिकारी किंवा कर्मचार्याने 8000 मीटर उंचीची तीन शिखरे आजपर्यंत सर केलेली नाहीत. ती शिवाजी ननवरे यांनी केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा देशभरात उंचावली आहे.
शिवाजी ननवरे हे लोणी काळभोर येथे रहात असून त्यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील कोंढेज (ता. करमाळा) हे आहे. ते सध्या नागपूर शहर पोलीस दलात गुन्हे शाखेत सहायक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहेत. ननवरे हे माऊंट मनासलू शिखर सर करणारे महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलेच अधिकारी आहेत.
त्यांनी 24 सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता जगातील आठव्या क्रमांकाचे उंच असलेले माउंट मनासलू शिखर सर करून भारताचा तिरंगा तसेच महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकावून पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शिवाजी ननवरे हे महाराष्ट्र पोलीस दलातील चौथे एव्हरेस्टवीर आहेत.
ननवरे म्हणाले माउंट मनासलू शिखर हे चढाईस अत्यंत खडतर आहे. बर्फाचा भाग जास्त असल्यामुळे 7 हजार मीटर उंचीनंतर प्रचंड त्रास होतो; मात्र आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर माऊंट मनासलू सर करावे लागते.
माउंट मनासलू शिखर सर करण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक क्षमता देखील असणे आवश्यक आहे.
उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे साधारण चालताना देखील शरिराची दमछाक होते; परंतु जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्सच नेहमी यशस्वी होतात.
माऊंट मनासलू हे जगातील आठ नंबरचे उंच शिखर आहे. हिमालय पर्वतातील हे शिखर 8163 मीटर उंचीचे असून नेपाळ चीन सीमेवर स्थित आहे.
यावर्षी सतत बदलत्या हवामानामुळे मला हे शिखर सर करण्यासाठी 20 दिवस लागले. यासाठी त्यांना नागपुरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, सहआयुक्त अस्वती दोर्जे, उपायुक्त राहुल माखनिकर, पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.





