Mount Everest : गिर्यारोहकांच्या कामाची बातमी; भूकंपामुळे ‘माऊंट एव्हरेस्ट’चा प्रदेश केला बंद !

Mount Everest | Earthquake – तिबेटमध्ये झालेल्या ६.८ रिश्टर क्षमतेच्या भूकंपामुळे चीनने जगातील सर्वात उंच शिखर मानले जाणाऱ्या माऊंट एव्हरेस्टचा निसर्गरम्य प्रदेश पर्यटकांसाठी बंद केला आहे. माऊंट कोमोलांग्मा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात पर्यटकांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
माऊंट एव्हरेस्टवर चीनच्या बाजूने चढाई करण्यासाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांसाठीचा बेस कॅम्प तिबेटमधील डिंगरी येथेच असतो. तेथेच भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपामुळे या बेस कॅम्पवरील कर्मचारी आणि पर्यटक सुरक्षित आहेत, असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
भूकंपामुळे बेस कॅम्पजवळच्या एका हॉटेलचे नुकसान झाले. मात्र हा निसर्गरम्य परिसर अबाधित राहिला असल्याचे चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
चीनच्या बाजूने एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी गेल्या वर्षभरात १३,७६४ गिर्यारोहक आले होते. ही संख्या २०२३ मधील संख्येच्या दुप्पट आहे. या मार्गे सिंगापूर, मलेशिया, जर्मनी आणि फ्रान्सचे गिर्यारोहकांचे प्रमाण लक्षणीय असते.





