आईचं घर हजार आठवणी…तिघी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Tighe movie teaser : नुकताच नवीन वर्षाचा प्रारंभ होऊन काही दिवस गेले आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर बंपर कमाई केली. त्यामुळे नवीन वर्षाची सुरूवातच मराठी चित्रपटाने दणक्यात केली असे म्हटले तर वावगे वाटू नये. त्यामुळे २०२६ या वर्षात अनेक उत्तमोत्तम चित्रपट सिनेससिकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच ‘तिघी’ या मराठी चित्रपटाचा उत्साहवर्धक टीझर प्रदर्शित झाला आहे.
तिघी या नावातच चित्रपटाची गोष्ट दडलेली आहे. एक आई आणि तिला असणाऱ्या दोन मुली यांच्या नात्याची गोष्ट तिघी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत आईवर अनेक मराठी चित्रपट येऊन गेले आहेत. अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर मानाचे स्थान निर्मााण केले आहे. या चित्रपटातही आईला केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाची कथा असल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आल्याचे दिसते.
View this post on Instagram
अवघ्या काही क्षणांच्या या टीझरमधून एका घरातल्या तीन स्त्रियांच्या भावविश्वाची प्रभावी झलक अनुभवायला मिळते. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील दुरावा, न बोललेल्या भावना, तणाव, आठवणी आणि तरीही त्या सगळ्याच्या पलीकडे असलेले प्रेम हे सगळं अतिशय वास्तवदर्शी पद्धतीने टीझरमध्ये मांडण्यात आले आहे.
खरंतर आई आणि मुलीचे नाते अनेकदा शब्दांपलीकडचे असते. प्रेम व्यक्त होत नाही, ते जाणवते. त्याच पद्धतीची मांडणी चित्रपटात केल्याचे दिसते. या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले आहे. तर निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे. येत्या ६ मार्च रोजी मोठ्या पडद्यावर तिघी हा चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.





