मुंबई – विरार पश्चिमेकडील जॉय विले इमारतीत राहणाऱ्या एका सात महिन्याच्या बाळाचा इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळाची आई खिडकी बंद करत असताना तिचा तोल गेला आणि तिच्या खांद्यावरून बाळ अचानक खाली पडले. विरार पश्चिमेच्या बोळींज येथे जॉय विले नावाचे निवासी संकुल आहे. या संकुलात पिनॅकल नावाची इमारत आहे. या इमारतीत २१ व्या मजल्यावरील २१०४ या सदनिकेत विकी सदाने आणि पूजा सदाने हे दांपत्य राहतात. त्यांंना ७ महिन्यांचे बाळ होते. बुधवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पूजा सदाने या बाळाला खांद्यावर घेऊन खिडकी बंद करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र खिडकीजवळ पाणी पडल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल गेला. यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेले बाळ २१ व्या मजल्यावरून खाली पडले. या दुर्घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे सदाने दांपत्याला ७ वर्षांनंतर बाळ झाले होते. याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.