गोंदिया हादरलं ! आईची हत्या केल्यानंतर मुलाची आत्महत्या

गोंदिया : राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरु असताना गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका मुलाने आपल्या आईची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. यानंतर त्याने विहिरीत उडी मारून स्वतःदेखील आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सुलकनबाई बनोठे (वय 75) असे मृत महिलेचे नाव आहे तर लेखराज बनोठे (वय 54) असे आरोपी मुलाचे नाव आहे. सुलकनबाई बनोठे आणि तिचा मुलगा लेखराज बनोठे हे एकत्र राहत होते.
दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध आईकडे दारूसाठी पैसे मागितले आईने तिने पैसे न दिल्याने आईवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. नंतर आरोपी मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी सालेकसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. तसेच पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.





