Pimpri : डासांचा प्रादुर्भाव, वाढतेय रुग्णसंख्या

पिंपरी : शहरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया आजाराच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जुलै महिन्याच्या १४ दिवसांमध्ये शहरात तब्बल २१० डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. तर ७ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पावसाळ्यामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यासारखे आजार पसरतात. थंडी, ताप, अंगदुखी यासारखी लक्षणे असून जुलै महिन्यामध्ये ११ हजार ९२९ जणांना तीव्र थंडी ताप आला आहे. त्यामध्ये डेंग्यू सारख्या आजाराने त्रस्त असलेल्या डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या तब्बल २१० आहे. ही संख्या पूर्ण जून महिन्यामध्ये २०८ होती.
या महिन्याच्या १४ दिवसांमध्येच मागील महिन्याच्या आकडा गाठल्याने चिंता वाढली आहे. तर मलेरिया पॉझिटिव्ह अहवाल येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. जुलै महिन्याच्या १४ दिवसांमध्ये ४ जणांचा मलेरिया तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पावसाळ्यामध्ये ठिक-ठिकाणी पाण्याचे डबके साचतात. या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या किटकजन्य आजारांची साथ येते. जून महिन्याच्या तुलनेमध्ये जुलै महिन्यामध्ये थंडी ताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने वैद्यकीय विभागाचा ताप वाढला आहे.
मलेरियाचे चार रुग्ण
दरम्यान, या महिन्यामध्ये मलेरियाची चार रुग्णांना लागण झाली. डेंग्यू आणि मलेरिया या दोन्ही आजारांची रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, अद्याप एकही रुग्ण अस्वस्थ अवस्थेत नाही. तसेच मृत्यू कोणाचा झाला नसल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.
डासोत्पती स्थानके नष्ट करण्यावर भर
पावसाळ्यामध्ये किटकजन्य आजार वाढत असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्यात येतात. त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने कंटेनर सर्व्हे करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी डासोत्पत्तीची ठिकाणे आढळतील तेथील आस्थापना व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.





