Moshi News: मोशीतील ‘हाय टेन्शन’चा धोका हटणार? टॉवर स्थलांतरासाठी महापौर रवि लांडगे यांचा पुढाकार
Moshi News: मोशीतील प्रिस्टीन ग्रीन्स व निसर्ग राघवेंद्र परिसरातील नागरी वस्तीतून जाणाऱ्या धोकादायक हाय टेन्शन वाहिन्या सुरक्षित पर्यायी मार्गाने हलवण्याचे आदेश.

Moshi News – मोशी परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर रहिवासी भागातून जाणाऱ्या हाय टेन्शन विद्युत वाहिन्या आणि टॉवरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रिस्टीन ग्रीन्स, सिल्व्हर ९, भंडारी स्वराज, निसर्ग राघवेंद्र यांसह परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून हाय टेन्शन टॉवर सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या योग्य पर्यायी मार्गाने स्थलांतरित करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.
याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी युवा नेते अतिश बारणे, प्रिस्टीन ग्रीन्सचे चेअरमन काशिनाथ धारी यांच्यासह उमेश उगीले, प्रमोद स्वामी, अनिल वर्मा, अमन गोयल, नितीन पाटील, रमा प्रभा तसेच विविध सोसायट्यांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
रास्ता पेठ येथील महापारेषणच्या मुख्यालयात मुख्य अभियंता अनिल भारसाकळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत परिसरातील हाय टेन्शन टॉवर व विद्युत वाहिन्यांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढती लोकवस्ती, भविष्यातील नागरी विस्तार आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी यावरही चर्चा झाली.
कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी
मोशी, चऱ्होली आणि परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. वाढत्या लोकसंख्येमुळे वीज यंत्रणेवर वाढलेला भार, तांत्रिक बिघाड अथवा अन्य कारणांचा सखोल अभ्यास करून समस्येच्या मुळाशी जाण्याची गरज व्यक्त करण्यात आली. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक,
लहान मुले तसेच व्यावसायिक आस्थापनांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सोसायट्यांमधील पाणीपुरवठा, लिफ्ट आणि सुरक्षा यंत्रणांवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता क्षमता वाढविणे, तांत्रिक सुधारणा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.
“नागरिकांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही. टॉवर स्थलांतर आणि सुरळीत वीजपुरवठ्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा केला जाईल,”
– रवि लांडगे, महापौर





