Moshi News: कचर्याचे ढीग साचताहेत, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
Moshi News: मोशी कचरा डेपो दुर्घटनेचे परिणाम

मोशी – मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर शहरातील कचरा संकलन आणि विल्हेवाट व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचे पडसाद आता इंद्रायणीनगर व भोसरी परिसरात स्पष्टपणे उमटू लागले आहेत. अनेक रस्ते, अंतर्गत गल्ल्या आणि रहिवासी भागांमध्ये कचर्याचे ढीग साचल्याने परिसरात अस्वच्छता वाढली आहे.
वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरली असून माश्या, डास आणि भटक्या जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून महापालिकेने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
इंद्रायणीनगर आणि भोसरी परिसरातील मुख्य रस्ते, चौक, अंतर्गत गल्ल्या तसेच निवासी वस्त्यांमध्ये प्लॅस्टिक, ओला कचरा, अन्नाचे अवशेष, कागद, कपडे आणि इतर टाकाऊ वस्तूंचे ढीग साचलेले दिसत आहेत. काही ठिकाणी कचरा थेट रस्त्यावरच टाकण्यात आल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक दाबून प्रवास करावा लागत असून परिसरातील स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मोशी डेपो दुर्घटनेनंतर कचरा संकलनाची नियमित व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पूर्वी दररोज येणार्या घंटागाड्या उशिरा येत आहेत किंवा काही भागांत येतच नसल्याने कचरा दिवसेंदिवस साचत आहे. त्यामुळे नागरिकांना घरातील कचरा टाकण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी नाईलाजाने रस्त्याच्या कडेलाच कचरा टाकण्यास सुरुवात केली असून त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
स्थानिक नागरिक रविंद्र शिंदे यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत, मोशी डेपोतील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसू नये. पर्यायी कचरा व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा तातडीने कार्यान्वित करणे गरजेचे होते. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे सांगितले. परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर कचरा साचल्यास डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, त्वचारोग तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. साचलेल्या कचऱ्यात पावसाचे पाणी साठल्याने डासांची उत्पत्ती वेगाने होते. तसेच कुजणाऱ्या कचऱ्यामुळे हवेत दुर्गंधी आणि जंतूंचे प्रमाण वाढून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना अधिक धोका निर्माण होतो.
या परिस्थितीचा परिणाम वाहतुकीवर आणि स्थानिक व्यवसायांवरही होत आहे. रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग असल्याने वाहनचालकांना वळसा घालून जावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. दुकानांसमोर कचरा साचल्याने दुर्गंधीमुळे ग्राहक येण्याचे प्रमाण घटल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे परिसरातील आर्थिक व्यवहारांवरही परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कचरा संकलनाची प्रक्रिया लवकरच पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. मात्र नागरिकांनी केवळ आश्वासनांवर न थांबता तातडीने प्रभावी उपाययोजना करून रस्त्यांवरील कचरा हटवावा, नियमित संकलन व्यवस्था सुरू करावी आणि मोशी डेपो दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या कचरा व्यवस्थापनाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी केली आहे.





