Pimpri : मोशी रुग्णालयासाठी २०२८ पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे ७०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. या इमारतीचे ३५ टक्के काम पूर्ण झाले असून येत्या १८ महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान पूर्ण करावे लागणार आहे. डिसेंबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या या ३४० कोटींच्या प्रकल्पाची उभारणी अडीच एकर जागेवर करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण रुग्णालयास सहाय्यक ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे शहरातील वाढत्या लोकसंख्येला आधुनिक आरोग्य सुविधा मिळणार आहेत.
मोशी येथील गायरान जागेच्या आरक्षणावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासकीय रुग्णालयासाठी जागा ताब्यात घेण्यात आली आहे. या १५ एकर जागेतील अडीच एकर जागेवर मोशी रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी डिसेंबर २०२४ मध्ये कामाचा आदेश देण्यात आला असून या कामाची मुदत डिसेंबर २०२६ पर्यंत आहे. म्हणजेच १८ महिन्यांमध्ये काम पूर्ण करावे लागणार आहे.
डिसेंबर २०२६ मध्ये रुग्णालयाची इमारत बांधून पूर्ण झाली तरी त्यानंतर रुग्णालयातील अंतर्गत कामे जसे की फर्निचर व इतर संसधाने बसवण्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यास आणखी एक ते दीड वर्ष इतका कालावधी लागेल. म्हणजेच मोशी रुग्णालय २०२८ च्या मध्यामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध होईल.
हे रुग्णालय आठ मजली असून अत्याधुनिक आणि सुसज्ज वैद्यकीय कॅम्पसला दृष्टिक्षेप ठेऊन इमारती काम सुरू आहे. यामध्ये भविष्यातील शैक्षणिक व निवासी पायाभूत सुविधांचाही समावेश करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून, तिसऱ्या मजल्यापर्यंतच्या बांधकाम पूर्णत्वाकडे आले आहे. काम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असून लवकरच नागरिकांना जागतिक दर्जाचे, रुग्णाभिमुख आणि पर्यावरणस्नेही आरोग्यसेवा अनुभवता येणार असल्याचा दावा अधिकार्यांनी
कसे असेल रुग्णालय ?
२७४ चारचाकी व २५० दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था
आपत्कालीन सेवा, ओपीडी, रेडिओलॉजी, डायग्नोस्टिक, बालरोग, स्त्रीरोग, मानसिक आरोग्य, डे केअर यांसारख्या विभागांचे
नियोजन
सर्वात वरील मजल्यांवर आयसीयू, डायालिसिस, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, वॉर्ड्स, स्पेशल रूम्स
आठव्या मजल्यावर कर्मचाऱ्यांचे निवास, लेक्चर हॉल व डॉरमिटरीची सुविधा
वायसीएमवरील ताण कमी होणार
पिंपरी चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय हे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. मोशी रुग्णालय सुरू झाल्यानंतर या रुग्णालयावरील ताण कमी होईल. तसेच भविष्यात वायसीएममधील वैद्यकीय महाविद्यालय देखील मोशी रुग्णालयात सुरू करण्याबाबत प्रशासन विचाराधीन आहे. तसेच मोकळ्या जागेमध्ये कर्करोग रुग्णालय, निवासी इमारत करणे शक्य आहे.
मोशीतील हे भव्य रुग्णालय केवळ एक आरोग्य सुविधा नसून, हे पिंपरी चिंचवडच्या आरोग्यदृष्ट्या शाश्वत भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या प्रकल्पाचे काम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असून, पर्यावरणस्नेही व ऊर्जा कार्यक्षम रचनांसह उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देण्याचा आमचा निर्धार आहे.
प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका





