Moshi building collapse: आशा – निराशेच्या हिंदोळ्यावर नातेवाईक; प्रत्येक क्षण ठरतोय असह्य
Moshi building collapse : रात्र असो वा दिवस, अनेक नातेवाईकांनी घटनास्थळ सोडलेले नाही

पिंपरी : मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेला ४८ तासांहून अधिक काळ उलटला. तरीही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सात जणांचा शोध अद्यापही सुरूच आहे.
मात्र, या बचाव मोहिमेपेक्षाही अधिक कठीण काळ अडकलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांवर ओढावला आहे. प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन दिवसांपासून अनेक नातेवाईक डोळ्यांत आशेचा किरण घेऊन उभे आहेत. प्रत्येक यंत्राचा आवाज, प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक अधिकाऱ्याच्या येण्या-जाण्याकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे.
रात्र असो वा दिवस, अनेक नातेवाईकांनी घटनास्थळ सोडलेले नाही. कुणी झाडाखाली बसून देवाकडे प्रार्थना करत आहे, तर कोणी आपल्याच विचारात हरवून गेल्याचंही दिसत आहे. मोबाइलवर सतत येणाऱ्या फोनला उत्तर देतानाही आवाज भरून येत आहे.
काही माहिती मिळाली का? या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांची असहाय्यता स्पष्ट दिसून येत आहे. बचाव पथकांकडून मिळणाऱ्या प्रत्येक अपडेटकडे नातेवाइकांचे लक्ष लागलेले आहे. मात्र, ठोस माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.
काही वेळा माहिती जाणून घेण्याच्या प्रयत्नात पोलीस प्रशासन आणि नातेवाइकांमध्ये शाब्दिक वादही होत असल्याचे चित्र दिसून आले. पोलिसांकडून परिस्थिती शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी आपल्या माणसाची काळजी नातेवाइकांच्या संयमाची परीक्षा घेत आहे.
घटनास्थळी महिलांची आणि लहान मुलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून येत आहे. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आहेत, तर काही जण एकमेकांना धीर देत आहेत. परिसरात निर्माण झालेली शांतता आणि बचाव कार्यासाठी सुरू असलेल्या यंत्रसामग्रीचा आवाज यामुळे वातावरण अधिकच गंभीर झाले आहे.
दरम्यान, पावसामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पाणी साचल्याने बचाव कार्य अत्यंत सावधगिरीने सुरू आहे. त्यामुळे वेळ लागत असला तरी अडकलेल्यांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





