Moshi Accident: माझा मुलगा अजून जिवंत आहे का हो साहेब..?; मोशी कचरा डेपो दुर्घटना
Moshi Accident: आमच्या माणसांपर्यंत पथक पोहोचले का?

Moshi Accident: बचाव मोहीम ७८ तासांहून अधिक काळ सुरू राहिल्याने घटनास्थळी अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा संयम अखेर सुटू लागला. सुरुवातीपासूनच पोलीस प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वारावर बंदोबस्त ठेवून नातेवाईकांना बचाव कार्यात अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून काही अंतरावर थांबवले होते.
मात्र, आत नेमके काय सुरू आहे, बचाव कार्य कितपत पुढे गेले आहे आणि आपल्या माणसांपर्यंत पथके पोहोचली का, याबाबत अधिकृत माहिती वेळेवर मिळत नसल्याने अस्वस्थता वाढत गेली.
घटनास्थळी उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. इतका वेळ झाला… माझा मुलगा आता जिवंत असेल का?, माझा मित्र बाहेर येईल ना? असे अनेक प्रश्न नातेवाईकांकडून वारंवार उपस्थित अधिकाऱ्यांना विचारले जात होते.
काहींच्या डोळ्यांत अश्रू होते, तर काहीजण देवाचा धावा करत बचाव मोहिमेकडे आशेने पाहत होते. बचाव पथकाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतानाही प्रतिकूल परिस्थितीमुळे मोहिमेचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढत नव्हता. प्रत्येक हालचालीकडे नातेवाईकांचे लक्ष लागले होते.
एखादे यंत्र सुरू झाले किंवा अधिकारी आत-बाहेर गेले की, काहीतरी सकारात्मक घडल्याची आशा त्यांच्या मनात निर्माण होत होती. मात्र प्रतीक्षा वाढत गेल्याने मानसिक तणावही वाढत गेला. घटनास्थळी मानवी वेदना आणि आशा-निराशेचा संघर्ष सतत पाहायला मिळत होता.
मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी वाढविली पोकलेनची संख्या
दुर्घटनेनंतर अडकलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव यंत्रणांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ठेवले. मोहिमेच्या प्रारंभी केवळ दोन पोकलेनच्या साहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यावर नागरिकांनी आणि राजकीय व सामाजिक संघटनांनी प्रचंड रोष व्यक्त केला.
त्यानंतर कचऱ्याचा प्रचंड साठा, सतत कोसळणारा ढिगारा आणि प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी यंत्रसामग्रीची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर टप्प्याटप्प्याने सहा ते आठ पोकलेन घटनास्थळी कार्यरत करण्यात आले. जड यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटविण्याचे काम अधिक वेगाने सुरू झाले. मात्र प्रत्येक हालचाल अत्यंत सावधगिरीने करावी लागत असल्याने बचाव कार्याला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत होता.
अडकलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा होऊ नये, यासाठी यंत्रसामग्रीचा वापर नियंत्रित पद्धतीने करण्यात येत होता. यंत्रसामग्री वाढविल्यानंतरही मोहिमेतील आव्हाने कायम होती. कचऱ्याचा अस्थिर ढिगारा आणि जागेची मर्यादा यामुळे बचाव पथकाला प्रत्येक टप्प्यावर नव्याने नियोजन करावे लागत होते. त्यामुळे वेळ लागत असला तरी अडकलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्याला प्राधान्य देत बचाव मोहीम सुरू ठेवण्यात आली.
दुर्घटनेतही चमकोगिरी
एकीकडे बचाव पथके जीव धोक्यात घालून अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होती, तर दुसरीकडे काही स्वयंघोषित समाजसेवक आणि संघटनांचे पदाधिकारी घटनास्थळी केवळ प्रसिद्धीच्या उद्देशाने आल्याची चर्चा रंगली.
प्रत्यक्ष मदतकार्य करण्याऐवजी मोबाइलवर व्हिडिओ चित्रीकरण, थेट प्रक्षेपण आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्याकडे काहींचा अधिक कल असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. काही जण घटनास्थळी काही वेळ थांबून व्हिडिओ तयार करून निघून गेल्याचेही दिसून आले.
त्यामुळे खऱ्या मदतकार्यापेक्षा प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न अधिक होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. आपत्तीच्या काळात बचाव मोहिमेला सहकार्य करण्याऐवजी अशा प्रकारची वर्तणूक योग्य नसल्याची प्रतिक्रिया घटनास्थळी उपस्थितांनी दिली.
घोषणाबाजीमुळे काही काळ तणाव
घटनास्थळी काही लहान संघटनांकडून घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. बचाव पथके आणि प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत असताना घोषणाबाजीमुळे परिसरातील वातावरण अधिक गोंधळाचे झाले.
घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी संबंधितांना शांत राहण्याचे आणि बचाव मोहिमेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. प्रशासनाचे संपूर्ण लक्ष अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यावर केंद्रित असल्याने कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, नातेवाईक आधीच मानसिक तणावाखाली असताना घोषणाबाजीमुळे त्यांची अस्वस्थता आणखी वाढल्याचे दिसून आले.
आधी उत्तर द्या, नातेवाईक-अधिकाऱ्यांत वाद
बचाव मोहिमेला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने घटनास्थळी अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांचा संताप वाढत होता. बचाव कार्याच्या प्रगतीबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याच्या कारणावरून नातेवाइक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये अनेकदा शाब्दिक वाद झाले.
नातेवाइकांकडून बचाव कार्य नेमके कुठपर्यंत आले?, आमच्या माणसांपर्यंत पथक पोहोचले का? अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. अधिकाऱ्यांकडून संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी प्रतीक्षा वाढत गेल्याने नातेवाईकांचा संयम सुटत होता.
दरम्यान, लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाल्यानंतरही नातेवाइकांनी त्यांना घेराव घालत कामकाजाबाबत जाब विचारला. आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या, अशी मागणी करत बचाव मोहिमेच्या गतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
त्यानंतर प्रशासनाने नातेवाईकांशी संवाद साधत बचाव मोहिमेची माहिती देण्याचा प्रयत्न केला. तरीही आपल्या आप्तस्वकीयांच्या सुरक्षिततेची चिंता नातेवाइकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.
Moshi Accident : नातेवाईक शोकसंतप्त; चार दिवसाची प्रतिक्षा अखेर हाती मृतदेह





