Moscow Plane Crash : अफगाणिस्तानमध्ये एक मोठी विमान दुर्घटना झाली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हे विमान अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीतून जात असताना वाटभरकटले. त्याचदरम्यान एका उंच डोंगराला धडकून विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी पहाटे बदख्शां प्रांतातील जेबक जिल्ह्यातील डोंगराळ भागात हे विमान कोसळले आहे. हे भारताचे प्रवासी विमान असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये नुकतीच एक दुर्दैवी विमान दुर्घटना झाली आहे. ते दुर्घटनाग्रस्त विमान भारताचं नव्हतं. तसेच कुठलंही नॉन शेड्यूल्ड (एनएसओपी) किंवा चार्टर्ड विमान अफगाणिस्तानमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेलं नाही. हे एक मोरोक्कन नोंदणीकृत छोटं विमान होतं. आम्हीदेखील यासंबंधीच्या अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहोत. ” असे म्हटले आहे. दरम्यान, भारताचं अधिकृत निवेदन येईपर्यंत अफगाणिस्तानी माध्यमांनी दावा केला होता की हे भारतीय विमान होते.
बदख्शां प्रांताच्या सूचना आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख जबीहुल्लाह अमीरी यांनी या दुर्घटनेची माहिती देताना सांगितलं, बदख्शां प्रांतातील कुरान-मुंजन आणि जेबक जिल्ह्यामधील डोंगराळ प्रदेशात एक प्रवासी विमान कोसळलं आहे. घटनेचा तपास करण्यासाठी अफगाणिस्तानी सरकारने एक पथक पाठवले आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे ही विमान दुर्घटना झाली आहे.
अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजच्या हवाल्याने अनेक वृत्तसंस्थांनी सुरुवातीला म्हटले होते की हे विमान भारताचं होतं. परंतु, केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की, दुर्घटनाग्रस्त विमान भारताचं नव्हे तर मोरोक्कोचे होते.