मोसंबीचा ‘आंबेबहार’ हंगाम बहरला; दररोज होतेय 50 ते 60 टन आवक

पुणे – आंबट-गोड, रसाळ, टिकाऊ मोसंबीचा “आंबेबहार’ हंगाम सध्या बहरला आहे. मार्केट यार्ड फळ बाजारात दररोज 50 ते 60 टन मोसंबीची आवक होत आहे. सुरुवातीला कमी होणारी आवक आता वाढली आहे. कमी पावसामुळे हंगाम लवकर संपण्याचा अंदाज आहे. घाऊक बाजारात मोसंबीला किलोस दर्जानुसार 30 ते 45 रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात एक किलो मोसंबीची 50 ते 75 रुपये किलो भावाने विक्री होत आहे.
मोसंबीचे तीन बहार
साधारणपणे ऑगस्टमध्ये मोसंबीचा “आंबेबहार’ सुरू होतो. तो फेब्रुवारीपर्यंत सुरू असतो. त्यानंतर “मृगबहार’ मोसंबीची आवक सुरू होते. तर, जूनमध्ये “अडकन’ बहारातील मोसंबीची आवक सुरू होते. आंबेबहार मोसंबीचा गोडवा जास्त असतो. त्यामुळे घरगुती ग्राहक, ज्युस विक्रेत्यांकडून मागणी आहे.
परराज्यांतूनही मागणी
पुण्यातील फळबाजारातून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापुरातील बाजारांत मोसंबी विक्रीस पाठवली जात आहे. गोवा, कर्नाटक, बेळगाव भागातून मोसंबीला मागणी आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
“कमी पावसामुळे यंदा डाळींब, पपई, कलिंगड, अननस, सफरचंदांची आवक कमी होत आहे. सर्व फळांचे भाव तेजीत आहेत. त्या तुलनेत मोसंबीचे भाव स्थिर आहेत. त्यामुळे मागणी जास्त आहे. दिवाळीमध्ये भाववाढ होण्याची शक्यता आहे.” – सोनू ढमढेरे, व्यापारी
मोसंबीचे फायदे
- मोसंबीमध्ये व्हिटॅमिन
- सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात.
- नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.
- हृदयाचे आरोग्य सुधारते, अन्न पचनास मदत होते.





