पोलीस भरतीत एक लाखापेक्षा अधिक महिला उच्चशिक्षित

मुंबई – राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस भरतीचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी भरती असून एकूण 17 हजार 471 पदांवर भरती करण्यात येणार आहे. परंतु, यामध्ये महिलांसाठी केवळ 3,924 पदे आहे. पण या पदांसाठी लाखोंच्या घरात महिलांनी अर्ज भरले आहेत. ज्यामध्ये एक लाखापेक्षा अधिक महिला या उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य पोलीस भरतीच्या महिलांसाठी असलेल्या 3942 जागांसाठी एकूण दोन लाख 78 हजार 829 महिला उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
महिलांनी पोलीस भरतीचे अर्ज भरताना आपली प्रथम पसंती ही मुंबई विभागाला दिली आहे. अनेक महिलांनी दोन ते तीन ठिकाणी अर्ज भरले असून यातही त्यांनी पहिली पसंती ही मुंबई विभागालच दिलेली असल्याने मुंबई विभागासाठी इतर विभागांच्या तुलनेने अधिक अर्ज आलेले आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी वर्गातून देण्यात आली आहे.
राज्य पोलीस दलातील 17 हजार 471 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी 16 लाख 88 हजार 785 अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील पोलीस शिपाई व चालकांच्या एकूण पदांपैकी 30 टक्के पदे महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे आता प्राप्त झालेल्या अर्जांमुळे प्रत्येक पदासाठी किमान 71 महिला उमेदवारांमध्ये स्पर्धा होणार आहे.
पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यातील 66 केंद्रांपैकी 22 केंद्रांमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. मिरा – भाईंदर, छत्रपती संभाजी नगर शहर, नवी मुंबई, सोलापूर शहर, नाशिक शहर, अमरावती शहर, मुंबई लोहमार्ग, पालघर, सांगली, नाशिक ग्रामीण, अहमद नगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, बीड, जालना, यवतमाळ, लातूर, वाशीम, भंडारा, वर्धा व पुणे लोहमार्ग या 22 पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांचा समावेश आहे.





