लोक अदालतीत लाखाहून अधिक दावे निकाली; सर्वाधिक प्रकरणे निकाली काढण्यात पुणे पहिल्या स्थानी

पुणे – राष्ट्रीय लोकअदालतमध्ये सर्वाधिक प्रकरणे निकाली काढण्यात पुण्याने आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. शनिवारी (दि.9) झालेल्या लोकअदालतीत एक लाख 10 हजार 192 प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले. त्यातून 396 कोटी 2 लाख 99 हजार 200 रुपयांचे तडजोड शुल्क वसूल झाले आहे.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी लोक अदालत आयोजित केली. दावे निकाली काढण्यासाठी 133 जणांचे पॅनेल नियुक्त केले होते. या पॅनेलची संख्या देखील राज्यात सर्वाधिक होती, अशी माहिती पाटील यांनी दिली. दाखलपूर्व स्वरुपाचे 2 लाख 16 हजार 86 दावे लोक अदालतीत ठेवण्यात आले. त्यापैकी 79 हजार 956 दावे निकाली काढले. त्यातून 76 कोटी 21 लाख 94 हजार 253 रुपये तडजोड शुल्क वसूल केले. तर 72 हजार 477 प्रलंबित प्रकरणांमधून 30 हजार 336 प्रकरणे निकाली काढली. त्यात 319 कोटी 81 लाख 4 हजार 947 रुपयांचे तडजोड शुल्क वसूल केले.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी, पोलीस प्रशासन, आणि नागरिकांचे सहकार्य, तर प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. लोकअदालतमध्ये तडजोड केल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा वाचतो. होणाऱ्या मानसिक त्रासातून सुटका होते. – सोनल पाटील, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
दाव्याचे प्रकार निकाली दावे
बॅंकेची कर्जवसुली 3552
तडजोड पात्र फौजदारी गुन्हे 29385
वीज देयक 157
कामगार विवाद खटले 71
भूसंपादन 103
मोटार अपघात दावे न्यायाधिकरण 146
वैवाहिक विवाद 285
धनादेश बाऊन्स 2212
इतर दिवाणी 924
पाणी कर 68180
ग्राहक विवाद 18
इतर 5186





