Nagar | 6 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे

नगर, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या घोषणनंतर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिण योजनेत पात्र महिलांच्या खात्यावर दीड हजार प्रमाणे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पाठवण्याचे आव्हान महिला बालकल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनासमोर होते.
मात्र, गेल्या तीन दिवसात जिल्ह्यातील ६ लाख ९२ हजार पात्र महिलांपैकी किमान ६ लाख महिलांच्या खात्यावर तीन हजारांप्रमाणे योजनेचा निधी वर्ग करण्यात आला आहे.
जिल्ह्यात बहिण माझी लाडकी योजनेत ७ लाख ८ हजार महिलांचे अर्ज आले होते. या अर्जाची पडताळणी करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेनूसार जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तालुकानिहाय वॉर रुम तयार करून तसेच योजनेचे नोडल अधिकारी मनोज ससे यांच्यासह गाव पातळीवर अंगणवाडी सेविका,
ग्रामसेवक, तालुका पातळीवर तहसीलदा, गटविकास अधिकारी आणि महिला बालविकास अधिकारी यांनी प्रयत्न केल्याने ६ लाख ९२ हजार महिलांचे अर्ज योजनेसाठी पात्र ठरले. तीन दिवसांपूर्वी अचानक यातील १ लाख २१ हजार महिलांचे बँके खाते बंद अथवा आधार लिंक नसल्याचे समोर आले.
त्यानंतर १५ आणि १६ ऑगस्टला यातील जवळपास सर्व महिलांशी संपर्क साधून यातील 70 ते 80 टक्के महिलांचे बँक खाते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे. अद्याप 25 ते 30 हजार महिलांचे खाते ऑनलाईन लिंक होणे बाकी असून ३१ ऑगस्टपर्यंत ते लिंक झाल्यास संबंधीत महिलांच्या खात्यावर योजनेच्या पहिल्या दोन महिन्यांचे पैसे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.





