वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरात मंकीपॉक्सच्या 14 हजार रुग्णसंख्येची पुष्टी केली आहे. त्याचबरोबर आफ्रिकेत मंकीपॉक्समुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती डब्ल्यूएचओचे महासचिव टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी बुधवारी दिली आहे.
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, हे सर्व मृत्यू आफ्रिकेत झाले आहेत आणि हाच प्रदेश आहे जिथे मांकीपॉक्सचा प्रादुर्भाव ऐतिहासिकदृष्ट्या आढळून आला आहे. गुरुवारी, डब्ल्यूएचओ (WHO) एका समितीची दुसरी बैठक बोलावेल, ज्यामध्ये मंकीपॉक्सचा उद्रेक हा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय आहे की नाही हे ठरवण्यात येणार आहे.
मंकीपॉक्सचा होतोय झपाट्याने प्रसार..
15 जुलै रोजी, WHO ने जगभरात मंकीपॉक्स संसर्गाच्या 11 हजार 634 प्रकरणांची पुष्टी केली होती. त्यानंतर गुरुवारी हा आकडा 14 हजारांवर पोहोचला आहे. अशाप्रकारे चार दिवसांत संसर्गाचे सुमारे अडीच हजार रुग्ण आढळले आहेत. खरं तर, आत्तापर्यंत अमेरिका, कॅनडामध्ये मंकीपॉक्स संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी, आतापर्यंत मंकीपॉक्सचा संसर्ग जगातील 75 हून अधिक देशांमध्ये आढळून आला आहे.