Pune District : राजगुरूनगर नगर परिषदेत प्रभागात महिलांना जास्त संधी

राजगुरुनगर : राजगुरूनगर नगर परिषदेच्या निवडणुकीतील १० प्रभागातील २१ नगरसेवकपदाच्या जागांसाठी बुधवारी (दि. ८) रोजी प्रांत अधिकारी अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी आरक्षण सोडत काढली. महिलांसाठी ११ तर पुरुषांसाठी १० जागा आरक्षित झाल्या आहेत. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण जागेसाठी यापूर्वीच आरक्षित झाले आहे.
आरक्षण सोडतीसाठी माजी नगराध्यक्ष बापू थिगळे,माजी सरपंच प्रदीप कासवा, माजी नगरसेविका रेखा क्षोत्रिय, संपदा सांडभोर, मनोहर सांडभोर, मंगेश गुंडाळ, सागर सातकर, राहुल पिंगळे यांच्यासह कमी संख्येने इच्छुक, त्यांचे समर्थक आणि नागरिक उपस्थित होते. आरक्षण सोडत चिट्ठी काढून काढण्यात आले. नगर परिषदेचे अधीक्षक राहुल लामखडे, साधना शिंदे, विद्या वऱ्हाडी, अमर मारणे, धनश्री राऊत, गणेश देव्हरकर, माधुरी पाटील, उर्मिला दुधाळे यांनी आरक्षण सोडतीसाठी नियोजन केले.
राजगुरूनगर नगर परिषदेमध्ये ११ महिला नगर सेवक निवडून येणार आहेत. तर दहा नगरसेवक पुरुषांमधून निवडण्यात येणार आहेत. नगर सेवक आरक्षण सोडतीकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले होते. मात्र, प्रत्यक्षात आरक्षण सोडतीकडे महिलांसह नागरिकांनी पाठ फिरवली. तब्बल ११ जागांवर महिला नगरसेवक असल्या तरी त्यांचे पतीदेव कारभार पाहणार, हे या आरक्षण सोडतीवरून लक्षात येत आहे. केवळ ७ महिला आरक्षण सोडतीसाठी उपस्थित होत्या.
तालुक्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या राजगुरुनगर नगर शहरात पाणी, कचरा, रस्ते, आरोग्य आदी सेवा सुविधांचा अभाव आहे. निवडून येणाऱ्या नगरसेवक व नगराध्यक्षापुढे हे प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. राजकीय दृष्ट्या राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीकडे राजकीय पक्षांच्या नेत्याचे लक्ष राहिले आहे.
प्रलंबित कामे कळीचा मुद्दा ठरणार
निवडणुकीसाठी मतांचे राजकारण करताना शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याने येऊ घातलेल्या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला मतदार संधी देणार कोणता पक्ष सत्तेत येणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार असले तरी सत्तेची गणिते करण्यात राजकीय नेते आता गुंतणार आहेत तर निवडणुकीची तारीख प्रसिद्द होईपर्यंत मतदारांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा मात्र सुरू होणार आहे.
राजगुरुनगर नगर परिषेदेचे १० प्रभागातील २१ जागांचे आरक्षण पुढील प्रमाणे (कंसात मतदार संख्या) : प्रभाग एक (२३८०मतदार) : नामाप्र, सर्वसाधारण (महिला), प्रभाग दोन (२६०१ मतदार) : नामाप्र, सर्वसाधारण (महिला), प्रभाग तीन (२०७६ मतदार) : सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण, प्रभाग चार (२०९७ मतदार) : सर्वसाधारण (महिला),सर्वसाधारण
प्रभाग पाच (२६०१ मतदार) : सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण, प्रभाग सहा (१३२६ मतदार) : नामाप्र (महिला), सर्वसाधारण प्रभाग सात (३४४१ मतदार) : अनुसूचित जमाती (महिला), नामाप्र, सर्वसाधारण (महिला) प्रभाग आठ (२६६९मतदार): नामाप्र (महिला), सर्वसाधारण प्रभाग नऊ (३८९३ मतदार) : नामाप्र (महिला), सर्वसाधारण
प्रभाग दहा (२७८६ मतदार : अनुचित जाती, सर्वसाधारण (महिला).





