11 वी प्रवेश प्रक्रियेत अधिक सुसूत्रता

पुणे : राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या समान गुणांच्या आधारे प्रवेश देताना जन्म दिनांकापासून ज्येष्ठ विद्यार्थी अगोदर याप्रमाणे क्रम आणि जन्म दिनांक समान असल्यास विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव म्हणजे नाव-वडिलांचे नाव-आडनाव याप्रमाणे इंग्रजी घेऊन त्या वर्णाक्षरांच्या क्रमानुसार क्रम ठरविण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता (एसईबीसी) सामान्य प्रशासन विभागाच्या 5 जुलै 2021च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी लागणार आहे. इनहाऊस कोटांतर्गत प्रवेश कोणत्याही टप्प्यावर करण्याची व प्रत्यार्पित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबई महानगर क्षेत्र व पुणे महापालिका क्षेत्रातील वगळण्यात आलेल्या गावांचा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत समावेश करावा लागणार आहे.
प्रथम पसंतीक्रम मिळून प्रवेश न घेतल्यास, घेतलेला प्रवेश रद्द केल्यास, विद्यालयाने प्रवेश नाकारल्यास या तीन कारणांनी विद्यार्थ्यांना तीन नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येत व असे विद्यार्थी चौथ्या विशेष फेरीमध्ये समाविष्ट होऊ शकतात. शासन निर्णयातील तरतूदीच्या अनुषंगाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आवश्यक बदलाबाबत शिक्षण संचालकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश शिक्षण विभागाचे सहसचिव इ.मु.काझी यांनी काढले आहेत.





