‘सुरांपेक्षा गरिबीवर जास्त लक्ष’ अभिजीत सावंतकडून ‘सिंगिंग रिऍलिटी शो’ची पोलखोल

मुंबई – सोनी टेलिव्हजन वरील प्रसिद्ध सिंगिंग रिऍलिटी शो ‘इंडियन आयडल’ने आजवरच्या सर्वच सिंगिंग कार्यक्रमांचे रेकॉर्ड मोडले आहे. इंडियन आयडलचे आजवरचे सर्वच सिझन हिट गेले आहेत. यंदाचा सिझन मधील सगळ्याच स्पर्धकांच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडल एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. ‘इंडियन आयडल’ च्या पहिल्या सीजनचा विजेता अभिजीत सावंत याने स्वतः कार्यक्रमाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.कार्यक्रमाचा टीआरपी वाढवण्यासाठी कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून निरनिराळ्या पद्धती अवलंबल्या जात असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. या मुद्द्यांवरून अनेकदा ‘इंडियन आयडल १२’ वादाच्या भोवऱ्यातही अडकला आहे. अभिजीत सावंत यांनी याच मुद्यावरून नाराजी व्यक्त केली आहे.
अभिजीत म्हणाला, ‘आजकाल रिऍलिटी शोमध्ये स्पर्धकाच्या गाण्याऐवजी आणि गुणांऐवजी या गोष्टीवर जास्त भर दिला जातो की त्याला बूट पॉलिश करता येतात की नाही किंवा मग तो किती गरीब आहे. या स्पर्धकांची आर्थिक परिस्थिती कार्यक्रमाच्या टीआरपीसाठी वापरली जाते किंवा मग स्पर्धकांमध्ये प्रेमाचा ट्विस्ट दाखवला जातो.’
काही दिवसांपूर्वी ‘इंडियन आयडल १२’ मधील स्पर्धक ‘सवाई भट्ट’ हा ऑडिशन वेळी बाहुल्यांचा खेळ दाखवून त्यातून मिळणाऱ्या पैशांनी घर चालवत आहे आणि राहत असलेले घर देखील छोटे आहे दाखविण्यात आले होते. मात्र तो मुळात गरीब नाहीच असं म्हणत फॅन्सने सोशलवर टीका केली होती. दरम्यान, कार्यक्रमाच्या टीआरपीसाठी वापरलेल्या या युक्तीमुळे इंडियन आयडलवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.



