Mood Swings During Pregnancy: गर्भवतींचे मूड स्विंग्ज्: जाणून घ्या कारणं आणि उपाय

Mood Swings During Pregnancy: गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय नाजूक पण सुंदर टप्पा असतो. या काळात आई होण्याचा आनंद असला तरी, अनेक महिलांना हार्मोनल बदलांमुळे मानसिक आणि शारीरिक त्रासांचा सामना करावा लागतो. त्यात सर्वात सामान्य म्हणजे मूड स्विंग्ज्. क्षणात आनंद, क्षणात रडू, चिडचिड, थकवा अशी मनःस्थिती. तज्ज्ञांच्या मते, हा अनुभव नैसर्गिक आहे आणि योग्य उपाययोजना केल्यास सहज सांभाळता येतात.
मूड स्विंग्ज का होतात?
तज्ज्ञ सांगतात की गर्भवतीच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स झपाट्याने वाढतात. हे हार्मोन्स गर्भाच्या आरोग्यासाठी आवश्यक असले तरी, त्याचा थेट परिणाम झोपेवर व भावनिक संतुलनावर होतो.
पोटाचा वाढता आकार, पाठदुखी, वारंवार लघवी होणे, अपचन, पायांना सूज येणे या शारीरिक बदलांमुळे अस्वस्थता निर्माण होते.पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांना बाळंतपणाची आणि बाळाच्या आरोग्याची चिंता भेडसावते.आयुर्वेदानुसार गर्भधारणेत वात दोष वाढतो, तर दुसऱ्या तिमाहीत पित्त दोषही सक्रिय होतो. त्यामुळे निद्रानाश, चिडचिड, राग आणि थकवा वाढतो.
योग आणि प्राणायामाचे फायदे
योगतज्ज्ञांच्या मते, गर्भवतींनी हलकी योगासने आणि प्राणायाम केल्यास मूड स्विंग्ज्वर नियंत्रण मिळवता येते.
वज्रासन – जेवणानंतर ५-१० मिनिटे बसल्यास पचन सुधारते आणि झोपही चांगली लागते.
भ्रामरी प्राणायाम – चिंता, अस्वस्थता आणि चिडचिड कमी करण्यास उपयुक्त.
मार्जरी आसन – पाठीचा कणा लवचिक ठेवते, पाठदुखीपासून आराम देते.
जीवनशैलीत बदल गरजेचे
रात्री उशिरा जागरण टाळा; १० वाजेपर्यंत झोपणे उत्तम.
मोबाईल, टीव्हीचा वापर कमी करा. निळा प्रकाश झोपेवर परिणाम करतो.
दररोज शांत वातावरणात फेरफटका मारा.
शांत संगीत, मंत्र ऐकल्याने मन प्रसन्न राहते.
आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधल्याने मानसिक ताण कमी होतो.
आयुर्वेदिक उपाय
तेल मालिश – नारळ, मोहरी किंवा तीळ तेलाने डोकं व पाय मालिश केल्यास ताण कमी होतो, झोप सुधारते.
शतावरी आणि अश्वगंधा – मानसिक संतुलनासाठी उपयुक्त, परंतु फक्त डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावेत.
सात्विक आहार – दूध, तूप, मूग डाळ, भाज्या, फळं आणि सुका मेवा गर्भवतीसाठी फायदेशीर. मसालेदार, तळलेले पदार्थ टाळावेत.
गर्भवती महिलांमधील मूड स्विंग्ज ही अतिशय सामान्य बाब आहे. थोडेसे बदल जीवनशैलीत, योग्य आहार, योग आणि प्रियजनांचा आधार यामुळे ही अवस्था सहज पार करता येते. मात्र समस्या गंभीर वाटल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.





