Virat Kohli : ‘ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूंनी संपवली विराटची कसोटी कारकीर्द…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा मोठा दावा

Virat Kohli’s Test retirement : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अलीकडेच रोहित शर्मा पाठोपाठ कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले. त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण त्याने इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी तयारी सुरु केली होती. पण त्याच्या निवृत्तीबाबत माजी इंग्लिश फिरकीपटू मॉन्टी पनेसर यांनी मोठा दावा केला आहे. पनेसर यांचे मत आहे की, ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूंवर सातत्याने अडचण येण्याच्या समस्येवर तोडगा न सापडल्याने विराटने इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवृत्ती घेतली.
मॉन्टी पनेसर विराटबद्दल काय म्हणाले?
इंग्लंडसाठी ५० कसोटी सामने खेळणाऱ्या आणि २०१२ मध्ये भारतात आपल्या संघाला कसोटी मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पनेसर यांचे म्हणणे आहे की, कोहलीला यापूर्वीच्या इंग्लंड दौऱ्यांच्या तुलनेत ऑफ स्टंपभोवती फिरणाऱ्या चेंडूंना सामोरे जाणे अधिक कठीण गेले आहे. २०१४ मधील निराशाजनक दौऱ्यानंतर कोहलीने २०१८ मध्ये इंग्लंडमध्ये शानदार पुनरागमन केले होते. मात्र, २०१४ मध्ये जेम्स अँडरसनने या दिग्गज फलंदाजाला खूप त्रास दिला होता.
Monty Panesar on Virat Kohli 💪🔥#MontyPanesar #ViratKohli #Cricket #Teamindia pic.twitter.com/GzvupKfzuA
— Cricadium (@Cricadium) June 9, 2025
तो कसोटी क्रिकेटचा उत्कृष्ट दूत राहिला –
मॉन्टी पनेसर यांनी सांगितले की, २०१८ मध्ये विराट कोहलीकडे शानदार पुनरागमनासाठी सर्व उत्तरे होती, परंतु करिअरच्या या टप्प्यावर असे करणे स्वाभाविकपणे खूप कठीण आहे. ते म्हणाले, “मला वाटते की त्यानी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एक खेळाडू म्हणून खूप चांगली कामगिरी केली आहे. तो कसोटी क्रिकेटचा उत्कृष्ट दूत राहिला आहे. त्यांला कदाचित असे वाटत असेल की त्यानी आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे, त्यानी सर्व काही मिळवले आहे आणि आता कदाचित त्याला वाटत असेल की युवा खेळाडूंना पुढे येण्याची वेळ आली आहे.”
पनेसर पुढे म्हणाले, “२०१८ मधील कोहलीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे त्यांच्यासाठी खूप कठीण असेल. एक साधे कारण असे आहे की गेल्या १२ ते १८ महिन्यांपासून तो ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूंवर खेळताना अडचणींना सामोरे जात आहे. त्याच्याकडे यावर कोणताही उपाय नाही. तुम्हाला माहीत आहे की चौथ्या आणि पाचव्या स्टंपवरील चेंडूंवर त्याला नेमकी काय समस्या आहे.”





