Monterosa Project: मोंटेरोझा प्रकल्पाचे भोगवटापत्र वादात
Monterosa Project:

अभियंत्यांची चौकशी; आर्किटेक्टचा परवाना निलंबित करण्याचे आदेश
Monterosa Project: सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथील मोंटेरोझा बांधकाम प्रकल्पाला अंतिम भोगवटापत्र देताना प्रत्यक्ष जागेवरील कामांची, तसेच पर्यावरणविषयक परवानग्यांची योग्य पडताळणी न केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने संबंधित आर्किटेक्टचा परवाना किमान एक वर्षासाठी निलंबित करून त्यांचा काळ्या यादीत समावेश करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त पनीत कौर यांनी दिले आहेत, तसेच विकसकाची महापालिका हद्दीतील सर्व कामे थांबविणे आणि संबंधित अभियंत्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
हिंगणे खुर्द येथील सर्वे क्रमांक १९, हिस्सा क्रमांक ५, ७, १०, ११ आणि १२, प्लॉट क्रमांक ६ येथे हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला अंतिम भोगवटापत्र देताना मंजूर नकाशानुसार कामे पूर्ण झाली आहेत का, पर्यावरणविषयक ना हरकत प्रमाणपत्रातील अटींचे पालन झाले आहे का, तसेच पर्यावरण मंजुरीनुसार आवश्यक संमतीपत्रे (सीटीई आणि सीटीओ) मिळाली आहेत का, याची खातरजमा करण्यात आली नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.
प्रत्यक्षात कामे अपूर्ण असतानाही अंतिम भोगवटापत्र दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या प्रकरणात आर्किटेक्ट विलास जगन्नाथ येले यांनी अपूर्ण कामांकडे दुर्लक्ष करून बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिल्याने महापालिकेची दिशाभूल झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा परवाना निलंबित करून काळ्या यादीत समावेश करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत,
तसेच तुषार बिल्डर्स आणि बी. के. इन्फ्रा एलएलपीचे संबंधित मालक, विकासक व जबाबदार व्यक्ती यांच्या महापालिका हद्दीतील सर्व सुरू असलेल्या कामांना स्थगिती देण्याचे आणि पुढील आदेशापर्यंत त्यांचे बांधकाम प्रस्ताव थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणातील कनिष्ठ अभियंता निशिकांत छापेकर आणि उपअभियंता राहुल तिखे यांच्याविरुद्ध कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणाच्या आरोपांवरून विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेशही अतिरिक्त आयुक्त कौर यांनी दिले आहेत.





