#MonsoonSession2023 : अखेर ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम! पावसाळी अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत पूर्णवेळ चालणार…

मुंबई :- राज्यात पावसाने हाहाकार उडविला असून मुंबईसह कोकणात पडणाऱ्या या मुसळधार पावसाचा फटका पावसाळी अधिवेशनाला देखील बसणार की काय अशी चर्चा रंगू लागली होती. हे अधिवेशन उद्या, शुक्रवारी गुंडाळण्यात येणार असल्याची चर्चा करण्यात येत होती. पण याबाबत आज विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. यानंतर पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे 4 ऑगस्टपर्यंत पूर्णवेळ चालणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू झाले असून, अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. पहिल्याच दिवसांपासून शांततेत सुरू असलेले हे अधिवेशन लवकर गुंडाळले जाईल अशी चर्चा गुरुवारी सकाळपासूनच सुरू झाली होती. काही आमदारांनी तशी मागणीही केली होती. भाजप आमदार संजय कूटे यांनी तर आपण तशी विनंती सभागृहात करणार असल्याचे माध्यमांना सांगितले.
दुसरीकडे विधानसभेचे हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे असून या सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होत असते, अनेक समस्या सोडवल्या जातात. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करून चार ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालवावे, अशी मागणी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी विधानसभेत केली होती. तर विधिमंडळाच्या वरच्या सभागृहात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा हे पावसाळी अधिवेशन पूर्ण वेळ चालावे, अशी मागणी केली होती.
तर, बाळासाहेब थोरात हे विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना या सभागृहाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या भावना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आम्ही त्यांच्या भावना मांडू, त्यावर चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिले होते. यानुसार हे पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे 4 ऑगस्टपर्यंत नियमीतपणे चालणार आहे.





