संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात; सहा विधेयकं मांडली जाणार

Parliament Monsoon Session | संसदेच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या अधिवेशनात सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करतील. तर मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. सोमवारपासून सुरू होणारं संसदेचं अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये एकूण १९ बैठका होणार आहेत. या कालावधीत सरकारकडून सहा विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे.
सोमवारी (२२ जुलै) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता संसद भवन संकुलात माध्यमांशी संवाद साधणार आहेत. याआधी झालेल्या विशेष अधिवेशनामध्ये केवळ राष्ट्रपती अभिभाषण आणि नव्या खासदारांचा शपथविधी झाला होता.
केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेस नेते गौरव गोगोई आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीवर तृणमूल काँग्रेसने बहिष्कार घातला होता.
कोणत्या मुद्द्यांवर विरोधक एनडीए सरकारला कोंडीत पकडणार ?
अधिवेशनादरम्यान एनईईटी पेपर लीक, बेरोजगारी, रेल्वे सुरक्षा आणि कावड यात्रेबाबत यूपी सरकारच्या निर्णयासह अनेक मुद्द्यांवर विरोधक एनडीए सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
कोणती सहा विधयके मांडली जाणार ?
अधिवेशनादरम्यान सूचीबद्ध केलेल्या विधेयकांमध्ये वित्त विधेयक, आपत्ती व्यवस्थापन, बॉयलर विधेयक, भारतीय विमान विधेयक, कॉफी प्रमोशन अँड डेवलपमेंट आणि रबर प्रमोशन अँड डेवलपमेंट विधेयक यांचा समावेश आहे. याशिवाय एप्रोप्रिएशन विधेयक आणि जम्मू-काश्मीरच्या अर्थसंकल्पावरही चर्चा होऊन अर्थसंकल्प मंजूर करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज सल्लागार समिती स्थापन केली आहे. सभागृहाच्या कामकाजाबाबत ही समिती धोरण ठरवणार आहे. यात विविध पक्षांच्या १४ खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणारे हे अधिवेशन किती वादळी ठरणार हे पहावे लागणार आहे.
हेही वाचा:
अखेर जो बायडेन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार





