Weather update : मान्सून परतीच्या प्रवासाला ! राज्यात आतापर्यंत 22 % अधिक पाऊस; हवामान शास्त्रज्ञ काय म्हणाले, पाहा…

Weather update – राजस्थान व कच्छ परिसरातून वाहणारा वारा आणि कमी झालेल्या आर्द्रतेमुळे परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे २३ सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला.
ही प्रक्रिया सरासरी १ सप्टेंबरदरम्यान सुरू होत असते. पण गेल्या ५ वर्षांपासून हा प्रवास लांबत आहे. मागील वर्षी २५ सप्टेंबर रोजी राजस्थानातून माघारी परतला होता. राज्यात २१ सप्टेंबरपर्यंत सरासरी ९४६ मिमी पाऊस अपेक्षित असतो.
यंदा प्रत्यक्षात ११५७ मिमी म्हणजे २२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. नाशिक जिल्ह्यात ८७८ मिमीच्या तुलनेत ८१९ मिमी (९३%) तर छत्रपती संभाजीनगर येथे सरासरी ५३६.६ मिमीपेक्षा १२७.८% म्हणजे ६८५.९ मिमी झाला. हिंगोलीत सरासरीपेक्षा ३४% कमी तर अमरावतीत ६ टक्के कमी झाला.
५ वर्षांतील परतीचा प्रवास
९ आॅक्टोबर २०१९
२८ सप्टेंबर २०२०
६ आॅक्टोबर २०२१
२० सप्टेंबर २०२२
२५ सप्टेंबर २०२३
मान्सून माघारीच्या तयारीत असला तरी तो सुरुवातीचे काही दिवस जागेवरच रेंगाळण्याची शक्यता आहे. दरम्यान, २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान विदर्भात जोरदार आणि त्यानंतर मराठवाड्यात मध्यम तीव्रतेने तर मुंबईसह कोकण, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ पावसाचा अंदाज आहे.
– माणिकराव खुळे, निवृत्त शास्त्रज्ञ, हवामान विभाग





