Monsoon News : राज्यात 15 जूननंतरच पाऊस; पेरणीची घाई करू नये राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन
दक्षिण कोकणात मान्सून (Monsoon News) दाखल झाला असून, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Monsoon News : दक्षिण कोकणात मान्सून (Monsoon News) दाखल झाला असून, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.
मान्सूनचे (Monsoon News) आगमन लांबवणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या या अंदाजानुसारच आपली शेतीची काम करायला हवीत. कारण, 15 जूनपर्यंत पेरणीसाठीचा पाऊस पडणार नसल्याची माहिती दिली आहे. अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले असून, आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, अशी सूचना संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण प्रदेशातील काही भाग आणि मराठवाड्यात वादळी पावसाची स्थिती आहे.
दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांत (Monsoon News) दक्षिण कोकण, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कमीच आहे. तर राज्यातील उर्वरित भागांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला असून काही भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे.






