Pune : पावसाळी पाहणी दौरे : इलेक्शन इव्हेंट

संतोष गव्हाणे
पुणे – पावसाचा मुक्काम यावर्षी काहीसा लांबलाच आहे. मे महिन्यापासून ये-जा करणार्या या पावसाने गेल्या पाच महिन्यांत महापालिका प्रशासनाच्या पावसाळी नियोजनातील त्रुटी उघड केल्या आहेत. याच मुद्यावर बोट ठेवत महापालिका निवडणूक लढविण्यास सज्ज असलेले इच्छुक उमेदवार तसेच माजी नगरसेवकांनी सध्या पावसाचा फटका बसलेल्या भागात, प्रभागात पाहणी दौरे सुरू केले आहेत.
पावसाळी पाहणी दौरा हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्शन इव्हेंट ठरत आहे. यातूनच एका-एका प्रभागात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांना घेऊन चार-चौघांचा पाहणी दौरा होत आहे. शहरासह उपनगरांना पावसाने गेल्या काही दिवसांत चांगलेच झोडपून काढले.
महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेली गावे यासह नव्याने तयार झालेल्या प्रभागात पावसाळी नियोजन फसल्याचे त्या-त्या ठिकाणी साचणार्या पाण्यामुळे उघड झाले आहे, त्यातच रस्त्यावरील खड्डे, झालेली दुरवस्था याची भर पडली आहे. सामान्य नागरिकांची यातून गैरसोय हात असली तरी सगळ्याच माजी नगरसेवकांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या जुन्या-नव्या प्रभागात पावसाळी पाहणी दौरा उरकुन घेतला आहे.
रस्ते, सोसायट्या, सखल भागात साचलेल्या पाण्यात, खड्ड्यांंत थांबून फोटोग्राफी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हात उंचावून, बोट दाखवत, काळजी वाहू चेहरा करीत अनेक पोजमध्ये फोटो काढले. क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, शिपाई आणि त्या-त्या परिसरातील काही ओळखीचे चेहरे असलेले नागरिक अशी टिम तयार करून माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी पाहणी दौरा केल्याचे चित्र दिसले.
पावसाळी पाण्यात नाचत दौरा करतानाही आपल्या जुन्या-नव्या प्रभागाची हद्द कोणती, कोणत्या सोसायट्यातून मतदान आपल्याला होणार आहे, नवीन प्रभाग रचना झाल्याने त्यातील कोणत्या भागातून मतदान होणार आहे, असे परिपूर्ण नियोजन करीत इच्छुक उमेदवारांनी पावसाळी दौरे केले आहेत. एखाद्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमवून त्या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकार्यांना विनाकारण झापत, हात वर करून करून सूचना दिल्या गेल्या आहेत.
कधीकाळी नगरसेवक असल्याचा विसर…
पावसाळापूर्वी नालेसफाई केली नाही, ड्रेनेज लाइन स्वच्छ केलीच नाही. चेंबरची झाकण उघडली गेली नाहीत, पावसाळी वाहिन्या कमी पडल्या त्याचे काम का केले नाही, असे सवाल माजी नगरसेवकांकडून पालिकेच्या त्या-त्या विभागातील अधिकार्यांना केले गेले. जमलेल्या नागरिकांच्या गर्दीत अधिकार्यांचा पानउतारा करण्यात ही मंडळी कुठेच कमी पडली नाहीत.
परंतु, आपण आपल्याच प्रभागातील समस्येविषयी बोलत आहोत, आपणच या प्रभागाचे कधीकाळी (तीन वर्षांपूर्वी) नगरसेवक होतो. त्यावेळी आपणच ही कामे दूरदृष्टी ठेऊन प्राधान्याने करून घ्यायला हवी होती. परंतु, या गोष्टीचा विसर निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन असा इव्हेंट करणार्या माजी नगरसेवकांना पडला असावा. आता, पालिकेवर आयुक्तच प्रशासक असल्याने क्षेत्रीय कार्यालयातील अधिकार्यांनीही ही इव्हेंटबाजी अगदी शांतपणे ऐकून घेतली, ही बाब वेगळी. मात्र, हे पावसाळी पाहणी दौरे केवळ दिखाऊ असल्याचे नागरिकांना जाणवत होते.




