‘मान्सून ब्रेक’चा पुण्याला जबर फटका

पुणे – जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात “अत्यंत सामान्य’ श्रेणीतील पाऊस पडला आहे. शहर परिसरात अद्यापही 35 टक्के पावसाची कमतरता आहे. त्यातून एकूण शहराचा विचार केल्यास शिवाजीनगर भागात एकूण शहराच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात नैऋत्य मान्सूनचे आगमन उशीरा झाले. जुुलैमध्ये थोड्याफार चांगल्या सरी पडल्या.
अखेरीस झालेला एकूण पाऊस सरासरीपेक्षा तीन टक्के जास्त होता. मात्र, ऑगस्टच्या सुरुवातीलाच मान्सूनने “ब्रेक’ घेतल्याने ऑगस्टमध्ये हे चित्र बदलल्याचे दिसते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दि. 1 जून ते 11 ऑगस्टदरम्यान या वर्षीच्या मान्सून हंगामासाठी जिल्ह्यात अजूनही सामान्य श्रेणीचा पाऊस झाला, तरी तो आता नकारात्मक बाजूकडे वळू लागला आहे. सध्या जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान 614.8 मि.मी.च्या तुलनेत 569 मि.मी.सह सात टक्के पावसाची तूट जाणवत आहे.
शहरांप्रमाणे पावसाची नोंद होतेच; परंतु गेल्या काही वर्षांपासून शहरातल्या अंतर्गत भागातही पावसाचे “व्हेरिएशन्स’ दिसून येतात. एखाद्या भागात जास्त पाऊस असतो तर एखाद्या भागात ऊन असते. त्या अभ्यासानुसार शिवाजीनगर भागात पावसाचे प्रमाण यंदा कमी असल्याचे दिसून आले आहे. आकडेवारीनुसार, शिवाजीनगरमध्ये 393.5 मिमी सरासरी पावसाच्या तुलनेत 255.3 मिमी प्रत्यक्ष पावसाची नोंद झाली आहे.
या स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण पुण्यात तसेच राज्यात पावसाचा जोर कमीच राहणार आहे. त्याच वेळी, संपूर्ण महाराष्ट्रात 21 ऑगस्टपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे, असे “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी’ (आयआयटीएम) चे माजी संशोधक विनीत कुमार यांनी सांगितले.
सर्वांत कमी पाऊस झालेले जिल्हे
जालना: 48%
सांगली: 39%
सातारा, हिंगोली: 32%
औरंगाबाद: 28%
अमरावती: 27%
अकोला, नगर: 24%
बीड: 23%





