पुणे | मान्सून महाराष्ट्राच्या दारात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा आज स्थिर असून, पुढील तीन ते चार दिवसात मान्सून दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकुल परिस्थिती असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. तर पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी गारांचा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 जून दरम्यान मान्सून दाखल होतो. यावर्षीही मान्सून पुढील तीन ते चार दिवसात दाखल होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, त्या अधीच राज्यातील बहुतांश भागात पूर्वमौसमी पाऊस झोडपून काढत आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रात येत्या 8 आणि 9 रोजी बहुतांश भागात जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील 48 तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्याला आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकण-गोव्यातील बहुतांश भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. काही भागात गारांच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भातील कमाल तापमान 43 अंशावर
राज्यात ठिकठिकाणी पुर्वमौसमी पाऊस धुव्वाधार बॅटींग करत आहे. तर दुसरीकडे विदर्भातील कमाल तापमान वाढलेलेच आहे. बुधवारी (दि. 5) ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
तर वर्धा, नागपूर, गोंदिया, अमरावती, जळगाव या जिल्ह्यातील कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंशाच्या आसपास राहील, तर पावसामुळे रात्रीचा हवेतील गारवा पसरला होता.





