Mansoon Alert | राज्यात पावसाचा जोर ओसरला ; काही जिल्ह्यांना मात्र ऑरेंज अलर्ट

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तर पुढील २४ तासांत राज्यातील पालघर, धुळे, नंदूरबार आणि नाशिक जिल्ह्यातील घाट विभागात अतिजोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली असून, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
वायव्य मध्य प्रदेश आणि लगतच्या पूर्व राजस्थावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण-गोव्यातील बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दि. ६ सप्टेंबरला राज्यातील पालघर, धुळे, नंदूरबार आणि नाशिक घाट विभागात अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज दिला आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, जळगाव या जिल्ह्यांसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामानशास्त्र विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.





