अमेरिकेत मंकीपॉक्स आजाराची दहशत

टेक्सास – जगभरात सध्या करोना महामारीने हाहाकार माजविला आहे. या महामारीमुळे अमेरिकेतही लाखो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यातच आता अमेरिकेतील टेक्सास शहरामध्ये “मंकीपॉक्स’ व्हायरसचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
अमेरिकेत यापूर्वी 2003 साली मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले होते. अमेरिकेतील रोग नियंत्रक आणि प्रतिबंधक संस्थेने ही माहिती दिली आहे. मंकीपॉक्सबाधित व्यक्तीला डल्लासमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
या संबंधित रुग्णाने नायजेरियातून अमेरिकेत प्रवास केला होता. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना मंकिपॉक्सचा संक्रमण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी वैद्यकीय यंत्रणा तपासणी करत आहेत. हा रुग्ण ज्या विमानाने अमेरिकेत आला, त्या विमानातील प्रवाशांची माहिती घेतली जात आहे.
रुग्णाने दोन विमान बदलत अमेरिकेत प्रवेश केला होता. 8 जुलैला नायजेरियातील लागोसमधून अटलॅंटामध्ये आणि 9 जुलैला अटलॅंटामधून डल्लासमध्ये प्रवेश केला होता. सध्यातरी मंकिपॉक्सबाबत चिंता करण्याचे कारण नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

