पिंपरी | मावळातील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा

वडगाव मावळ (प्रतिनिधी) – मावळ विधानसभेतील सुमारे ४२ हजार महिलांच्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हफ्ते जमा झाले आहेत, अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित तीन हजार रूपये जमा झाले आहेत. रक्षाबंधन सणाच्या आधल्या दिवशी अर्थात शनिवारीच खात्यात पैसे आल्याने तालुक्यातील लाडक्या बहिणींची राखी पौर्णिमा यंदा जोरात होणार आहे.
गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा तळेगाव दाभाडे येथे आली होती. या यात्रेदरम्यान आपल्या मनोगतात बोलताना अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील पात्र महिलांच्या खात्यात १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील, असे सांगितले होते.
त्याप्रमाणे शनिवारी तालुक्यातील ४२ हजार महिलांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा झाले असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळला, अशी चर्चा तालुक्यातील महिलाभगिनी करत आहेत.
मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके यांनी तालुक्यातील भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘अजितदादा हे शब्दाला पक्के असणारे नेते आहेत, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.
तालुक्यातील बहुतांश महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे पैसे जमा होऊ न शकलेल्या भगिनींना येत्या आठ दिवसांत पैसे मिळतील,’ असे आमदार सुनिल शेळके यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांनी दिला होता शब्द –
अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेला मावळमधील महिलांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी अजित पवार यांना प्रतिनिधिक राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले होते.
यावेळी शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता भगिनींच्या खात्यावर जमा झाला का, असे अजित पवारांनी विचारले. त्यावर, पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील लाभार्थी भगिनींच्या बँक खात्यावर (शनिवारी) पैसे जमा झालेले असतील, असा शब्द अजित पवार यांनी दिला होता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही बहीण वंचित राहू नये, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज न केलेल्या भगिनींनी नाराज होण्याचे कारण नाही. त्यांनी अजूनही आवश्यक कागदपत्रांसह तातडीने अर्ज भरुन योजनेचा लाभ घ्यावा. – आमदार सुनिल शेळके





